शरद पवारांचा मोहोळ विधानसभेचा शिलेदार पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, प्रवेशानंतर उमेश पाटलांनी केली भूमिका स्पष्ट

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

मोहोळ येथील नेते उमेश पाटील हे पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती परंतु विधानसभेवेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी उमेदवाराचे काम केले आणि मोहोळ मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरे यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. परंतु त्यांनी पुनश्च उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा व्यक्त करत अजित पवारांच्या हस्ते पुनश्च राष्ट्रवादीत प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उमेश पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकी पुर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता. परंतु इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. सोलापुर जिल्ह्यातील “मोहोळ विधानसभा” या राखीव मतदारसंघा मधील मातब्बर प्रस्थापित नेत्या सोबत टोकाचे मतभेद झाल्यामुळे मी नाईलाजाने पक्ष त्याग केला होता. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजित दादांच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती. त्यामुळे मी व माझ्या सर्वपक्षीय सहका-यांनी मिळुन 15 दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन (राजू खरे) विधानसभेला 30 हजार मताधिक्याने निवडून आणला.

अजित दादांनी उमद्या मनाने स्वत:च्या पक्षाचा आमदार पडला तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बाण्याचे कौतुक केले. मी दादांना कधी सोडले नव्हते. फक्त एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता इरेला पेटला तर अपराजित मातब्बर नेत्याला देखिल पराभूत करू शकतो हे सिद्ध करायचे होते. माझा देवगिरी येथे सर्व मंत्री, आमदार व पार्थ दादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते झालेला पुन्हा पक्ष प्रवेश ही तांत्रिक बाब आहे. मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते. फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती. इतकच असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!