सोलापूरदेश - विदेशमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

‘स्थापत्य २०२५’ प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन, स्थापत्य प्रदर्शन ही सोलापूरकरांसाठी सर्वोत्तम पर्वणी : पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे

सोलापूर : प्रतिनिधी

घर बांधणे आणि सजवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी स्थापत्य प्रदर्शन ही सोलापूरकरांसाठी सर्वोत्तम पर्वणी आहे, असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी केले. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सतर्फे स्थापत्य २०२५ या बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी नॉर्थकोट मैदानावर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील, मेटारोल इस्पात प्रा. लि. (जालना) चे व्यवस्थापकीय संचालक डी. बी. सोनी, मेटारोलचे प्रमुख वितरक इब्राहिम मोतीवाला, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे अध्यक्ष इंजि. प्रशांत मोरे, सचिव इंजि. मनोहर लोमटे, उपाध्यक्ष इंजि. भगवान जाधव, खजिनदार इंजि. संतोषकुमार बायस उपस्थित होते.

प्रारंभी अतिरिक्त आयुक्त श्री. कारंजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि फीत कापून ‘स्थापत्य २०२५’ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तसेच स्थापत्य २०२५ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ‘स्थापत्य २०२५’ या स्थापत्य प्रदर्शनाचे प्रायोजकत्व मेटारोल इस्पात प्रा. लि. जालना यांनी घेतले आहे.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे म्हणाले, घर कसे बांधावे, घर बांधणीनंतर त्याची अंतर्गत सजावट कशी करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन एकाच छताखाली सोलापूरकरांना असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सने स्थापत्य २०२५ या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. घरबांधणी आणि सजावटीसाठी चांगल्या दर्जाच्या मटेरियलची माहिती येथे मिळत आहे. मध्यम आर्थिक परिस्थिती असणाऱ्यांना या प्रदर्शनाचा मोठा फायदा होणार आहे. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स या संस्थेने अनेक लोकोपयोगी सामाजिक कार्य केली आहेत. या संस्थेशी संबंधित अभियंत्यांनी सोलापूरकरांना चांगली सेवा दिली आहे, असेही श्री. कारंजे याप्रसंगी म्हणाले.

उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील म्हणाले, स्थापत्यशास्त्रावर अवघे विश्व उभे आहे. स्थापत्यशास्त्राला मोठा इतिहास आहे. घर बांधताना विविध साहित्य माफक दरात आणि उच्च दर्जाचे मिळावे हा या प्रदर्शना मागचा उदात्त हेतू आहे. सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसीलदार निलेश पाटील यांनी याप्रसंगी केले.

मेटारोल इस्पात प्रा. लि. (जालना) चे व्यवस्थापकीय संचालक डी. बी. सोनी म्हणाले, सोलापुरातील अनेक इमारतींमध्ये मेटारोल कंपनीचे स्टील वापरण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूरकरांशी आमचा अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहे. ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाचे आणि फायद्याचे स्टील देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोलापूरकरांनी मेटारोल कंपनीचे स्टील वापरून घर मजबुतीची निश्चिती करावी, असेही मेटारोलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सोनी याप्रसंगी म्हणाले.

नव्याने घर बांधू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच घराच्या अंतर्गत सजावटीसाठीची अतिशय उपयुक्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ‘स्थापत्य प्रदर्शन २०२५’ मधून सोलापूरकरांना देण्यात येत आहे. या प्रदर्शनात जागा विक्रीचे विविध प्रकल्प, प्रमोटर आणि बिल्डर, गृह कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था, सिमेंट कंपन्या, कन्स्ट्रक्शन केमिकल्स, स्टील, प्लंबिंग आणि सॅनेटरी वेअर, इलेक्ट्रिक मटेरियल, बांधकामास लागणारी अत्याधुनिक यंत्रे आणि उपकरणे, दरवाजे आणि खिडक्या, रूफिंग मटेरियल, टाईल्स, घरातील अंतर्गत सजावट, फर्निचर, लँडस्केपिंग, सोलार एनर्जी, लिफ्ट असे एकूण ७० स्टॉल आहेत.

या कार्यक्रमासाठी क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इंजि. सुनिल फुरडे, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे सहसचिव इंजि. जवाहर उपासे, सहखजिनदार इंजि. मनोज महिंद्रकर, माजी अध्यक्ष इंजि. अमोल मेहता, कार्यकारी समिती सदस्य इंजि. वैभव होमकर, इंजि. चंद्रमोहन बत्तूल, इंजि. सिद्धाराम कोरे, इंजि. काशिनाथ हरेगावकर, इंजि. गणेश इंदापुरे, इंजि. शैराज होमकर, इंजि. रामकृष्ण येमुल, इंजि. सुनील दूधगुंडी, माजी अध्यक्ष इंजि. प्रकाश तोरवी, माजी अध्यक्ष इंजि. इफ्तेखार नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे अध्यक्ष इंजि. प्रशांत मोरे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष इंजि. भगवान जाधव यांनी परिचय करुन दिला. नर्मदा कनकी यांनी सूत्रसंचालन तर असोसिएशनचे सचिव इंजि. मनोहर लोमटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सोलापूरकरांनी भेट देण्याचे आवाहन

स्थापत्य २०२५ प्रदर्शन २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी नॉर्थकोर्ट मैदानावर सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. सोलापूरकरांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!