सिंहगड इन्स्टिट्यूटमधील स्वच्छता कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्तांनी केले मार्गदर्शन

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात महापालिकेच्या स्वच्छतेची कार्यशाळेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कचरा वर्गीकरणाच्या प्रकाराविषयी माहिती दिली. या वेळेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, डॉ. रवींद्र व्यवहारे, प्रा. माणिक शिंदे, महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

अतिरिक्त आयुक्त रवी यांनी शहर स्वच्छतेसाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, सॅनिटरी कचरा अशा कचरा वर्गीकरणाचे प्रकार आणि त्याचे महत्त्व याविषयी दृकश्राव्य माध्यमातून माहिती दिली. महापालिकेच्या स्वच्छता विभागात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने साडेबारा लाख लोकसंख्या असलेल्या शहराची स्वच्छता प्रभावीपणे होत नाही. त्यासाठी आवाहन केल्यानुसार स्वयंसेवी संस्थेसह शहरवासीयांना सहकार्य केल्याने शहर स्वच्छतेसाठी मदत होत आहे.

कचरा वर्गीकरण, घंटागाडीतच कचरा टाकावा यासह स्वच्छता जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालयात जावून महापालिका प्रबोधन करीत आहे. याच अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि त्यांच्या पथकाने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात येऊन मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्वच्छतेची विविध उपक्रमाची माहिती देत स्वच्छतेची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.

स्वच्छतेसह ग्रीन बिल्डिंगविषयी कौतुक

प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी महाविद्यालयातील सांडपाण्याचा पुनर्वापर करुन साडेतेरा हजार झाडांना देत असल्याचे सांगत ग्रीन बिल्डिंगविषयी माहिती दिली. यावर अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आपल्या भाषणात सिंहगड महाविद्यालयातील स्वच्छता आणि शिस्तीचे कौतुक केले. प्रवेशद्वारापासून संपूर्ण परिसरात स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर आढळून न आल्याने कौतुक केले. 

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल 

अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आपणही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याचे सांगत आता एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या वापरामुळे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार असल्याचे सांगितले. एआयमुळे बेरोजगारी वाढणार नसल्याचे ठामपणे सांगितले. आता शेती सुधारणेत, ऊस लागवड पद्धतीत एआयचा वापर होत आहे. नुकतीच पुण्यात यावर परिषद झाल्याचे सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!