सोलापूर : प्रतिनिधी
जीएच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजीत केलेल्या ‘जीएच रायसोनी मेमोरियल चषक’ खुल्या तसेच ११ वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खुल्या गटात सोलापूरच्या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त विजय पंगुडवाले यांना बिगरमानांकित शिवाजी भोसले यांनी बरोबरीत रोखून स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदविला. पुण्याचा आंतरराष्ट्रीय कॅंडिडेट मास्टर प्रथमेश शेरला, सोलापूरचा मानस गायकवाड, पुण्याचा ओम लामकाने, बार्शीचा शंकर साळुंके, सागर गांधी, लातूरचा अथर्व रेड्डी, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे, सृष्टी गायकवाड, वेदांत मुसळे यांच्यासह २९ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली.
जुळे सोलापूर येथील टाकळीकर मंगल कार्यालय येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सोलापुर शहरासह माळशिरस, करमाळा, पंढरपुर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, माढा तसेच पुणे, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील १४१ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ११ वर्षाखालील गटात श्रेयस कुदळे, हर्ष जाधव, श्लोक चौधरी, हिमांशु व्हानगावडे, बार्शीची पृथा ठोंबरे, माळशिरसची अनन्या बाळापुरे या मानांकित खेळाडूंनी देखील उत्कृष्ट खेळ करत विजय नोंदविले.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन किरियाड हॉटेल उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक दर्शन सिंग व शिवा कंट्रक्शनचे मालक शिवानंद चीनगुंडे यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली. अध्यक्षीय मनोगतात दर्शन सिंग यांनी पालकांनी खेळाडूंना मोबाईल पासून परावृत्त करून बुद्धिबळ सारख्या बौद्धिक क्षमतेच्या विकास साधणाऱ्या खेळाकडे प्रोत्साहित करावे असे आवाहन करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी टाकळीकर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापिका श्रीमती नीलम उपाध्ये, संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, भरत वडीशेरला, अभिजित बावळे, यश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले.