“चॅम्पियन चषक” ९ वर्षाखालील राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा, खेळाडूंचा विक्रमी प्रतिसाद

3 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व द हेरिटेजच्या सहकार्याने सोलापुर चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या “चॅम्पियन चषक” ९ वर्षा खालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतर राष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू मुंबईचा नोवा आय्यर, रायगडचा धीमन हेमांग, पुण्याचे हेयान रेड्डी, अनिश जवळकर, ठाण्याचा कथित शेलार, नागपूरचा रिधान अग्रवाल तसेच मुलींच्या गटात मुंबईची गिरीश पै, सन्मरी पॉल, पुण्याचे अदिना मोहंती, अन्वी हिंगे सोलापूरची पृथा ठोंबरे, नंदुरबारची भूमी ढगढाके या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंनी आकर्षक खेळत विजयी सलामी दिली.

या स्पर्धेत यजमान सोलापूरसह मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, पालघर, छ. संभाजीनगर आदी राज्यातील विविध जिल्ह्यातुन ३६ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूसह एकूण २०२ नामांकित खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदवला.

गांधीनगर येथील द हेरिटेज येथे आजपासून सुरु झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस उपायुक्त राजन माने व मुंबईचे शिवसेना संपर्कप्रमुख, बेस्टचे चेअरमन व नगरसेवक अनिल कोकीळ यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली.

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजन माने यांनी खेळात हार-जीत यापेक्षा जिद्द व चिकाटी महत्वाची असते हा संदेश खेळाडूंना देत खेळाडूंनी महाराष्ट्र व देशाचे नाव उज्वल करावे असे सांगितले. तसेच अनिल कोकीळ यांनीदेखील पालकांनी खेळाडूंना प्रोत्साहित करावे व यश – अपयशात देखील मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असा मोलाचा सल्ला दिला व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेने नियुक्त केलेले प्रमुख पंच कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच संदेश नगरनाईक, सोलापूर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, विधानसभा संपर्कप्रमुख प्रशांत मांढरकर, महानगर प्रमुख दत्ता माने सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर,

संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील, सुभाष उपासे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमुख गायकवाड व सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले.

स्पर्धेत उपमुख्य पंच म्हणून सोलापूरचे वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे तसेच सहाय्यक म्हणून पुण्याचे शशिकांत मक्तेदार, सोलापूरचे युवराज पोगुल, रोहिणी तुम्मा, विजय पंगुडवाले, भरत वडीशेरला, यश इंगळे, नवीना वडीशेरला आदी काम पाहत आहेत.

या स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात स्पर्धा संपन्न होणार असुन मुले व मुलींच्या आकर्षक लढती उपस्थितांना पहावयास मिळत आहेत. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या दोन खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे. स्पर्धेत पाच व सहा वर्षीय बाल खेळाडू हे देखील आकर्षक खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!