सोलापूर : प्रतिनिधी
चोरीचे केलेले सोने विकत घेतल्याप्रकरणी सोनार विकास अशोक जाधव वय:-38, रा:- बार्शी यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री एन आर बोरकर यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, बार्शी येथील सराफ संजय जगदीश महादान्य यांचे मोहित अलंकार या नावाने सोन्याचे दुकान होते. त्याच्या दुकानात आरोपी शुभम वेदपाठक हा सुवर्ण कारागीर म्हणून काम करीत होता. त्यास संजय याने वेळोवेळी 38 लाखाचे 425 ग्रॅम सोने हे दागिने बनविण्यासाठी दिले होते. परंतु वेदपाठक हा दागिने बनवून देत नसल्याने संजय यास संशय आला, त्यावर त्याने त्याचे ड्रॉवर तपासले असता त्यामध्ये सोने दिसून आले नाही. म्हणून त्यांनी वेदपाठक याच्याकडे चौकशी केली असता, त्याने ते सोने मोडून आलेले पैसे जुगारात हरले बाबत सांगितले, त्यावरून सराफ संजय महादान्य यांनी बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यावरून पोलीस तपासात वेदपाठक यांनी यातील अर्जदार आरोपी विकास जाधव यास 32 ग्रॅम सोने विकले होते,म्हणून पोलिसांनी विकास जाधव यास अटक केली होती.
त्यावर विकास जाधव यांनी आपणास जामीन मिळावा म्हणून बार्शी येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
सदर अर्जाच्या सुनावणीच्या वेळी अर्जदार/ आरोपी याचे कडून काहीही हस्तगत झालेले नसल्याने आरोपीस जामीनावर मुक्त करण्यात यावे, असा युक्तिवाद मांडला त्यावर न्यायमूर्तींनी 25,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
यात अर्जदार/आरोपीतर्फे ऍड.रितेश थोबडे, ऍड.ओंकार वाघोले तर सरकार तर्फे ऍड. विनोद चाटे यांनी काम पाहिले.