सोलापूर : प्रतिनिधी
कामगाराने मालकाची बनावट सहीची पावती करून पाच जणांकडून ५२ लाख ५० हजार रुपये घेत, प्रेषक रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील पाच जणांना घराचा ताबा परस्पर दिला. याप्रकरणी विद्या मिलिंद लोलगे (वय ४१, रा. ब्रम्ह चैतन्य नगर, विजापूर रोड) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कामगार अब्दुल खय्यूम इब्राहिम शेख (वय ४५, रा. साई नगर गृहनिर्माण संस्था, जुळे सोलापूर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी शेख हा फिर्यादी यांच्याकडे साईट सुपर वायझर म्हणून कामास होता. त्याने २०१८ ते २०२२ दरम्यान, फिर्यादीच्या मालकीचे प्रेषक रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील रवींद्र पाटील यांच्याकडून १३ लाख, उमा लोकरे यांच्याकडून १० लाख, परमार यांच्याकडून २४ लाख व हिबारे यांच्याकडून ५० हजार, सेनाली त्रिकप्पा यांच्याकडून ५ लाख रुपये असे एकूण ५२ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. शिवाय घेऊन प्लॅटचा ताबा दिला. याबाबत आरोपीने खोटी पावती देऊन त्यावर फिर्यादीच्या खोट्या सह्या करून फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा तपास सपोनि. खंडागळे करत आहेत.