सोलापूर (प्रतिनिधी)

सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि समस्त मारवाडी समाज, सोलापूर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘पूरग्रस्तांना मदत अभियान’अंतर्गत मदत साहित्याचे वाटप यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. यामध्ये ज्वारीचे पीठ, गहू पीठ, तांदूळ, खाद्यतेल, मसाले, मिठ, मेणबत्त्या, साखर, दुध पावडर, प्लास्टिक बादल्या, चादरी, सतरंजी, साबण, मच्छर अगरबत्ती, टॉर्च, बॅटऱ्या,

तसेच भांडी, तवा, चमचा, काडेपेट्या आदी वस्तूंचा समावेश होता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ, तेलगाव, गाव पाथरी तसेच सेवा भारती शिव स्मारक येथे पूरग्रस्तांना धान्यकिट, साड्या, लहान मुलांचे कपडे, टॉवेल, सतरंजी आणि बेडशीटचे वाटप करण्यात आले.

या वाटप कार्यक्रमास सोलापूर माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष जवाहर जाजू, चंद्रकांत तापडिया, मधूसूदन कालानी, गोकुळ झंवर, प्रविण चंडक, आणि गोकुळ जाजू उपस्थित होते.

माहेश्वरी समाज आणि मारवाडी समाजाने दिलेल्या मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, “दान नव्हे तर दिलासा द्या” या समाजाच्या घोषवाक्याला प्रत्यक्षात उतरविण्यात आले आहे.

