सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या अखंड परंपरेनुसार तेली समाजाच्या मानाच्या काठी पालखीने श्री क्षेत्र तुळजापूरकडे आश्विन पौर्णिमेनिमित्त (कोजागिरी पौर्णिमा) प्रस्थान केले. शुक्रवार पेठ येथून संध्याकाळी सहा वाजता या धार्मिक यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

प्रारंभी श्री अंबाबाई-जगदंबा मातेच्या मूर्तीची पूजा-अर्चा व आरती करून पालखीचा विधिवत शुभारंभ झाला. पालखीतील उत्सव मूर्तीचे पूजन करीत भक्तांनी “जय देवी जगदंबे” च्या जयघोषात धार्मिक वातावरण भारावून गेले.

या प्रसंगी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी सौ. शांभवी सचिन कल्याणशेट्टी तसेच माजी महापौर शोभाताई बनशेट्टी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष ब्रम्हदेव गायकवाड, सचिव दत्तात्रय मेनकुदळे, तसेच पदाधिकारी विजय पुकाळे व शिवानंद येरटे उपस्थित होते.

श्री तुळजाभवानीच्या छबिनासाठी निघालेल्या या मानाच्या पालखीतील मानकरींचा सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रात व देशात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर व्हावे, शासनाने तातडीने मदत करावी अशी साकडं श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी घालण्यात आली.

परंपरेचा वारसा, श्रद्धेची ओढ आणि समाजातील ऐक्य यांचे दर्शन घडवणारी ही मानाची पालखी यात्रा सोलापूर शहरातून भक्तिभावाने तुळजापूरकडे निघाली असून मार्गावर ठिकठिकाणी भक्तांनी स्वागत व आरती करून मानाच्या देवीस व मानकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
