सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तत्काळ मार्गी लावून त्यांच्या दिवाळीला गोडवा आणावा, या मागणीसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या निवेदनात प्रमुख दहा मागण्यांचा समावेश असून कर्मचाऱ्यांच्या कल्याणाशी थेट संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये १५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेला मेडिकल कॅशलेस विमा तातडीने लागू करावा, ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १ जुलैची वेतनवाढ लागू करावी, तसेच मनपा कर्मचाऱ्यांना शासना प्रमाणे संपूर्ण ५८% महागाई भत्ता देण्यात यावा यांसारख्या मागण्यांना प्राधान्य देण्यात आले.

तसेच बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दररोज १०० रुपयांची वाढ, नवीन आकृतीबंधात वर्ग-४ मधील ८०० नवीन पदांची निर्मिती, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना २५,००० रुपयांचे समुह अनुदान देण्याची मागणी युनियनकडून करण्यात आली.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शिल्लक रजेचे रोखीकरण तातडीने मंजूर करावे, पेन्शन विक्री पुन्हा सुरू करावी, तसेच GST महसूलातून मनपाला योग्य ते अनुदान मिळावे या मागण्यांनाही निवेदनात विशेष स्थान देण्यात आले. याशिवाय मालमत्ता खरेदी-विक्रीपूर्वी मनपाचे कर (टॅक्स) NOC घेणे अनिवार्य करावे, तसेच घनकचरा विभागातील दीर्घकाळ गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ न करता शास्ती लावून पुन्हा कामावर घेण्यात यावे, अशी मागणीही यावेळी मांडण्यात आली.

या सर्व मागण्यांवर चर्चा केल्यानंतर आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, सचिव विठ्ठल सोनकांबळे, प्रमुख मार्गदर्शक इकबाल तडकल, खजिनदार अरुण म्हेत्रे, तसेच रामचंद्र चंदनशिवे, सुनील शिंदे, धनाजी लोंढे, बिभीषण गायकवाड, राहुल गायकवाड, संतोष गायकवाड, हिरामणी मस्के, नरेश कदम, अभिजीत रणदिवे यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या चर्चेच्या माध्यमातून महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना न्याय मिळेल, अशी आशा उपस्थितांनी व्यक्त केली.
