सोलापूर : प्रतिनिधी
“केवळ पुस्तकी ज्ञानाने मुले घडणार नाहीत तर त्यांच्या बुद्धीला आणि प्रतिभेला योग्य दिशा मिळण्यासाठी, त्यांना व्यक्त होणे गरजेचे आहे. ज्यावेळी आपण मुलांना बोलण्याची, प्रश्न विचारण्याची, आणि आपली मते मांडण्याची संधी देतो, तेव्हा त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर येतात. आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे, आणि हा आत्मविश्वास केवळ बोलण्याची संधी मिळाल्यानेच वाढतो. यातूनच भविष्यात ते अधिक आत्मविश्वासाने शिकतील म्हणून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अभिव्यक्ती’ आवश्यक असल्याचे मत महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी व्यक्त केले
येथील आनंदीबाई तगारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या पाठांतर स्पर्धेचा बक्षीस वितरण प्रशासनाधिकारी ढेपे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.प्रारंभी आनंदीबाई तगारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शीला मिस्त्री, सचिव वीणा पतकी, आनंदीबाई बालक मंदिरच्या शालेय समितीचे अध्यक्ष अँड. अर्चना कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य विजया निसार, पद्माकर कुलकर्णी, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा, निरीक्षक मंजुषा राठी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उमाकांत जाधव या पालकांनी आणि सेवासदन परिषदेतील शिक्षक अमित देशपांडे या परीक्षकांनी स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त केले केले.
या पारितोषिक वितरण कार्यक्रमात मोठा गटात विभागून प्रथम क्रमांक सपताळ आर्वी, व समर्थ कुलकर्णी, (द्वितीय) चिंचोलीकर शौर्या, (तृतीय) होनराव श्रीलक्ष्मी उत्तेजनार्थ हत्तुरे सन्निधी व निराळे श्रीनिधी. तर लहान गटात (प्रथम) क्रमांक मंठाळकर शुभ्रा, (द्वितीय) कुलकर्णी सानवी, (तृतीय) डांगे आराध्या उत्तेजनार्थ कुलकर्णी राही व जाधव अक्षरा. या विद्यार्थ्यांना प्रशासनाधिकारी ढेपे यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदीबाई तगारे बालक मंदिरच्या शालेय समितीचे अध्यक्ष अँड. अर्चना कुलकर्णी यांनी केले. बालक मंदिर मधील शिक्षिका अनुजा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत आणि उपस्थितांचे आभार मानले केले.
या पारितोषिक वितरण समारंभाला निशिगंधा जाधव, वृषाली ढोसाळे, पुनम ठाकूर, प्राजक्ता आपटे, सुप्रिया किणीकर, संध्या कुलकर्णी यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
