सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर येथील रहिवासी राचय्या हिरेमठ वय 50, विजयालक्ष्मी हिरेमठ वय 48, प्रिया संबाळ वय 25 विशाल हिरेमठ वय 23 केदार हिरेमठ वय 20, सर्व राहणार सोलापूर या सर्वांनी जावई सोमप्रकाश संबाळ, श्रीदेवी संबाळ, सिद्धरामय्या संबाळ रा. सोलापूर यांच्यावर खुनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून, त्यांना जिवे ठार मारण्याच्या आरोपातून सर्व आरोपींची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

याची थोडक्यात हकीकत अशी की, दि. 13/04/2020 रोजी रात्री 8.15 च्या सुमारास फिर्यादी संबाळ हे घरी असताना मागील व चालु असलेल्या भांडणाचा राग मनात धरून यातील आरोपांनी फिर्यादीचे घरी येऊन जावई सोमप्रकाश, श्रीदेवी संबाळ, सिद्धरामाय्या संबाळ या तिघांवर घरात घुसुन कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमा करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद फिर्यादी विजयालक्ष्मी संबाळ यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यावर पोलीस निरीक्षक बी. एच. पाटील यांनी तपास करून आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले होते. त्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे समोर झाली त्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण 13 साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये जखमी साक्षीदार, शेजारील रहिवासी, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, फोटोग्राफर यांच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या.

त्यामध्ये जिल्हा सरकारी वकील यांनी युक्तीवाद केला की, प्रकरणात स्वतः जखमी साक्षीदार आहेत, उद्देश स्पष्ट आहे, शस्त्र जप्त आहे. डॉक्टरांच्या साक्षी पुरक आहेत. असा युक्तीवाद करून आरोपीना दोषी धरून योग्य ती शिक्षा करणेबाबत मागणी केली, याउलट आरोपीचे वकील अॅड. शशि कुलकर्णी, अॅड विद्यावंत पांढरे यांनी असा युक्तीवाद केला की, साक्षीदारांच्या साक्षीमध्ये प्रचंड विसंगती आहे, डॉक्टरांची साक्ष कथानकाला पूरक नाही, स्वतंत्र कोणी साक्षीदार नाही, फिर्याद देण्यास उशीर झालेला आहे. त्यामुळे घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. आरोपींनी गुन्हा केलेला नाही, त्यामुळे सरकारपक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करू शकले नाही.

वरील सर्व युक्तीवादाचा विचार करून न्यायालयाने सर्व 5 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. विद्यावंत पांढरे, अॅड प्रणव उपाध्ये, अॅड प्रसाद अग्निहोत्री, अॅड रणजित चौधरी यांनी तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी काम पाहिले.
