टोल वसुलीतील लूट आणि दादागिरीविरोधात युवा भीम सेनेचे आंदोलन

2 Min Read

सोलापूर (प्रतिनिधी)

सोलापूर परिसरातील अक्कलकोट रोड कुंभारी टोल, मंगळवेढा-देगाव रोड टोल, बार्शी रोड टोल आणि देगाव रोड टोल या सर्व टोलनाक्यांवरील अन्यायकारक वसुली विरोधात युवा भीम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने अक्कलकोट रोडवरील वळसंग टोल प्लाजासमोर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

२०१६ सालीच भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने (NHAI) या टोलनाक्यांच्या बंदीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) पाठवला होता. तथापि, आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिक, शेतकरी आणि ट्रक चालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

फक्त २० किलोमीटरच्या अंतरात दोन टोलनाके असल्याने शेतकरी, ट्रक चालक आणि वाहन मालकांना दुहेरी टोल भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय टोलवरील काही कर्मचारी दादागिरी करून मध्यरात्री वाहन चालकांकडून जबरदस्तीने १००० ते १५०० रुपयांपर्यंत वसुली करत असल्याच्या तक्रारीही संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा लुट मारीच्या घटनांकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

युवा भीम सेनेचे अध्यक्ष महेश डोलारे म्हणाले, “सर्वसामान्य शेतकरी आणि ट्रकचालकांवर टोलदादागिरीचा भुर्दंड पडत आहे. प्रशासन आणि टोल व्यवस्थापन एकमेकांशी संगनमत करून सर्वसामान्यांची लूट करत आहेत. हे टोलनाके तातडीने बंद झालेच पाहिजेत.”

या आंदोलनात विकास गायकवाड, नागेश दासरे, मल्लू कांबळे, गणेश गायकवाड, मुमताज शेख, अनिता बेरा, नीता बनसोडे, मुमताज तांबोळी, छाया हेरवरे, संजय हेळवी यांसह अनेक ट्रकचालक, मालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

आंदोलनादरम्यान प्रशासनाने मागण्यांची दखल घेत टोल वसुलीतील गैरप्रकारांवर तपास सुरू करण्याचे आश्वासन दिले असून, टोल बंदीसंदर्भातील निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!