ॲड जयदीप माने यांचा युक्तिवाद, सतीश कदम आत्महत्या प्रकरण, डोंगरे पिता-पुत्रावरील खटला उच्च न्यायालयात रद्द

3 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सतीश कदम आत्महत्या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तुळजापुरातील किसन डोंगरे व त्यांचे पुत्र गुरुराज व नागेश डोंगरे यांच्या विरुद्ध भरलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने रद्द केला.

या खटल्याची हकीकत अशी की, सतीश कदम आणि किसन डोंगरे हे पूर्वी एकत्र कामात होते. त्यांनी समयकात सन १९८९ मध्ये तुळजापूर- नळदुर्ग रस्त्यावर जमीन खरेदी केली होती व त्या जमिनीत 26 प्लॉट पाडण्यात आले होते. त्यातील 25 प्लॉट विकण्यात आले होते. एक प्लॉट विकायचा राहिला होता. सतीश कदम यांच्या मुलाला पुणे येथे चष्म्याचे दुकान काढावयाचे होते व त्यांनी राहिलेला प्लॉट विकणे बाबत किसन डोंगरे यांचे मागे तगादा लावलेला होता परंतु किसान डोंगरे व त्यांच्या मुलांनी यापूर्वी विकलेले प्लॉट सहमतीने विकले आहेत असे लिहून देणे बाबत सतीश कदम यांना सांगितले होते.

त्याबद्दल किसन डोंगरे व त्यांची मुले गुरुराज व नागेश हे सतीश कदम यांना त्रास देत होते आणि त्या त्रासाला कंटाळून सतीश कदम यांनी दिनांक २५.११.२०२३ रोजी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना ताबडतोप उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान दिनांक २९.११.२०२३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सतीश कदम यांचा मुलगा प्रसाद सतीश कदम याने तुळजापूर पोलीस स्टेशनला डोंगरे पिता पुत्रांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती.

सदरची फिर्याद रद्द करणे बाबत डोंगरे पिता-पुत्रांनी ॲड. जयदीप माने (सोलापूर) यांचे मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदरच्या याचिकेची सुनावणी दरम्यान तुळजापूर पोलिसांनी न्यायालया दोषारोप पत्र चार्जशीट दाखल केले. त्यानंतर दोषारोप पत्र चार्जशीट खटला रद्द करण्यात यावा असा अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेत दाखल करण्यात आला.

सदर याचिकेच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर प्लॉट विक्रीचे पैसे मयत सतीश कदम यांनी चेकने स्वीकारले आहेत आणि सदरची रक्कम त्यांच्या बँक खाते मध्ये जमा झाली आहे,

सतीश कदम हे उच्च रक्तदाब व मधुमेहाबद्दल त्रस्त होते त्याचबरोबर ते व्यसनी होते दवाखान्यात दाखल झाल्यानंतर मयताच्या पोटातील द्रव्य तपासणीकडे रासायनिक तज्ञाकडे पाठवण्यात आले नाही, सतीश कदम यांनी आत्महत्या केली असे गृहीत धरूनच पूर्ण तपास करण्यात आला व दोष दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे ते रद्द होण्यास पात्र आहे. खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी डोंगरे पिता पुत्रांवरील खटला रद्द करण्याचे आदेश दिले.

या खटल्यात आरोपी डोंगरे पिता-पुत्रांतर्फे ॲड. जयदीप माने (सोलापूर), ॲड. आर. एस.उर्फ रामचंद्र पाटील(धाराशिव) यांनी तर सरकारतर्फे ॲड. वि. के कोटेचा आणि मूळ फिर्यादीतर्फे ॲड. बी. आय. महाजन यांनी काम पाहिले.

हा निर्णय महत्वाचा असल्याने या निर्णयाला ऑल महाराष्ट्र लॉ रिपोर्टर क्रिमिनल या कायद्याच्या पुस्तकात पान नंबर २३६७ वर स्थान मिळाले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!