सोलापूरकरांची दिल्लीकडे उत्स्फूर्त कूच, शंखनाद महोत्सवासाठी दिल्ली सज्ज

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

दिल्ली येथील भारत मंडपम येथे दिनांक १३ आणि १४ डिसेंबर दरम्यान ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ‘सनातन संस्थे’ च्या रौप्यमहोत्सवी वर्षातील एक विशेष पर्व असणार आहे. याठिकाणी सनातन राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी आज दिल्लीकडे प्रयाण केले. यामधे माजी नगरसेवक चंद्रकांत रामणशेट्टी, पी. डी. पी. ट्रस्टचे प्रसाद पंडित, पत्रकार उमाकांत चौंडे, अधिवक्ता चंद्रशेखर वारद, गोसेवक गोपाळ सोमाणी इत्यादींचा समावेश आहे.

दोन दिवसीय महोत्सवात ‘सनातन संस्कृती संवाद’, सांस्कृतिक-सामाजिक घडामोडी, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद-नक्षलवादाची पार्श्वभूमी, संरक्षणनीती आणि ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र’ या विषयांवर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उद्बोधन करतील. भारत मंडपम्‌मधील एक्झिबिशन हॉल क्रमांक ‘१२’ मध्ये भव्य प्रदर्शन लावण्यात येणार आहे.या प्रदर्शनीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हाताळलेल्या अनेक शस्त्रांचे साक्षात दर्शनही घेता येईल. यासमवेतच अन्य मराठा साम्राज्यातील सेनापतींनी चालवलेली शस्त्रे असणार आहेत. त्यात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भाला यांसारखी विविध शस्त्रे असतील.

तसेच महाराणा प्रताप यांच्या काळातील शस्त्रांसह कर्नाटकातील विजयनगर साम्राज्यकालीन तलवारी, शिवकालीन युद्धपरंपरा, धातूशास्त्र, ‘लोखंड ते शस्त्र’ या संकल्पनेवर आधारित मराठा शस्त्रनिर्मिती प्रक्रिया आणि मराठा सामरिक बुद्धिमत्तेचे दर्शन यांचा समावेश असेल. तसेच हिंदू स्त्रियांनी आत्मरक्षणासाठी वापरलेल्या शस्त्रांचेही प्रदर्शन होणार असून त्या काळातील स्त्रियांची रणशक्ती आणि युद्धातील भूमिका अधोरेखित केली जाणार आहे. हे केवळ प्रदर्शन नसून हिंदवी स्वराज्याच्या तेजातून ‘सनातन राष्ट्रा’ची नवी प्रेरणा देणारा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!