मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. भारतीय जनता पार्टीच्या या ऐतिहासिक विजयासाठी योगदान देणाऱ्या भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंड भरून कौतुक केले.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार घेतल्यापासून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या रखडलेल्या विकासकामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. त्यासोबतच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासमवेत पक्ष बांधणीदेखील सुरू केली होती. तसेच मनपाला जिल्हा नियोजन समितीतून भरघोस निधी देऊन शहर विकासाची कामे मार्गी लावली. शहराच्या मुबलक पाणीपुरवठ्यासाठी, स्वच्छतेसाठी शासन दरबारी मागणी करून त्याकरिताही निधी उपलब्ध करून दिला. रखडलेल्या विमानसेवेचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोडवून विमानसेवा, आयटी पार्कच्या मंजुरी आणि त्या कामाला गती येण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी नव्या सहकाऱ्यांना जोडून घेऊन नव्या आणि जुन्यांचा मेळ घालून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीची रणनीती आखली होती. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी प्रतिसाद देऊन सक्रिय सहभागी झाल्यामुळे मनपा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार काळात सोलापूर शहरात सभा घेऊन सोलापूरच्या जनतेला विकासाबद्दल आश्वस्त केले. त्याचा परिणाम म्हणून सोलापूरच्या जनतेने भाजपाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळवल्यानंतर शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले.

सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा दाखवलेल्या भक्कम विश्वासामुळेच हे अभूतपूर्व यश भाजपाला मिळाले असून भाजपाची एक हाती सत्ता सोलापूर महानगरपालिकेवर आली आहे. आगामी काळात सोलापूरची विस्तारित विमानसेवा, समतोल पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना, आयटी पार्क, एमआयडीसीतील सुविधा असे उर्वरित सर्व विषय मार्गी लावण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!