प्रस्थापितांचा पैशाचा वापर तरी “बाबा”लढला, लढवय्याला स्वीकृतची संधी मिळावी, जनसामान्यांच्या भावना.. आमदार देवेंद्र कोठे यांची भूमिका ठरणार महत्त्वाची..

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील राजकारणात मोची समाजाची भूमिका दिवसेंदिवस अधिक ठळक होत असून, आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली घडत असलेले राजकीय बदल लक्षवेधी ठरत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत मोची समाजातील माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. या निर्णयामुळे देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी मोची समाज खंबीरपणे उभा राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.

 

विशेष म्हणजे लष्कर, मोदी, इराण्णा वस्ती, झोपडपट्टी क्रमांक २, कोनापुरे चाळ, बापुजी नगर या भागांमध्ये देवेंद्र कोठे यांना लक्षणीय मताधिक्य मिळाले. या मताधिक्याने मोची समाजाची संघटित ताकद आणि कोठे यांच्या स्थानिक नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत अंबादास (बाबा) करगुळे यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला. देवेंद्र कोठे यांचे राजकिय विरोधक चेतन नरोटे यांच्याशी ही थेट लढत होती. पराभव पत्करावा लागला असला तरी अंबादास करगुळे यांनी प्रस्थापित राजकारणा विरोधात खंबीरपणे सामना केला. पराभवानंतरही त्यांनी संयम राखत कोणताही आक्रोश न करता आपली भूमिका ठाम ठेवली, याची शहरात चर्चा सुरू आहे.

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपली ताकद पणाला लावली होती. अंबादास करगुळे यांचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः होम-टू-होम प्रचार केला. तर चेतन नरोटे यांच्या पाठीशी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ठामपणे उभे राहिले. या दोन्ही नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळे चेतन नरोटे यांचा विजय झाला आणि काँग्रेसची अब्रू काही अंशी वाचली, अशी प्रभागात चर्चा आहे.

मात्र या साऱ्या घडामोडींमध्ये लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे आमदार देवेंद्र कोठे यांची भूमिका. निवडणुकीनंतरही त्यांनी अंबादास (बाबा) करगुळे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. गरीब, सामान्य कुटुंबातून येऊन थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला एक धाडसी युवक म्हणून करगुळे यांच्याकडे पाहिले जाते. मोची समाजातील तरुणांना संधी मिळावी, अशी भावना समाजात रुजत असून, त्याला कोठे यांचे पाठबळ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता अंबादास (बाबा) करगुळे यांना स्विकृत नगरसेवकपद मिळवून देण्यासाठी देवेंद्र कोठे प्रयत्नशील राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसे झाल्यास मोची समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाला नवी दिशा मिळेल, हे निश्चित. आगामी काळात देवेंद्र कोठे कोणती रणनीती आखतात, यावर शहरातील राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!