‘ऑपरेशन ऑल आऊट’मधून गुन्हेगारांची तपासणी, जिल्हाभरात नाकेबंदी, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींचा उपक्रम
जिल्हाभरात नाकेबंदी ९५७ वाहनांची तपासणी, बेशिस्तांना २८,३०० रुपयांचा दंड

सोलापूर : प्रतिनिधी
अमावस्येच्या निमित्ताने गुन्हे घडतात, हा अनुभव लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबवून जिल्हाभरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली. ५६ पोलिस अधिकारी आणि ३२० अंमलदारांनी १६४ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यातील २० जणांना वॉरंट बजावण्यात आले आहे.
सण-उत्सव, निवडणूक अशा काळात आता ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन ऑल आउट राबविले जाणार आहे. मालाविषयी किंवा शरीराविषयी गुन्हे दाखल असलेले आरोपी, जामिनावर सुटलेले आरोपी, सराईत गुन्हेगारांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा करू नये, सण-उत्सव काळात त्यांच्याच घरी राहावे, यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी पदभार घेतल्यापासून दुसऱ्यांदा ऑपरेशन ऑल आउट राबविले आहे. तपासणीवेळी घरी नसलेल्या सराईत गुन्हेगारांचे स्वतंत्र रेकॉर्ड ठेवले जात आहे.
रात्रीच्यावेळी वाहने तपासणी
अवैध धंद्यांसाठी रात्रीच्यावेळी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. त्यावेळी वाहनांची तपासणी करून वाहनातील व्यक्तींसह वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत विविध ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यात ९५७ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३८ बेशिस्त वाहन चालकांवर २८ हजार ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.