
सोलापूर : प्रतिनिधी
पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते परंतु अलीकडे जमिनीच्या वादातून कोयते काढून मारण्याचे प्रकार अनेक घडले आहेत. याच प्रमाणे ७ ते ८ जण कोयते घेऊन गल्लोगल्ली आणि कॉलनीमध्ये फिरून दहशत माजवतानाचे व्हिडिओ ही सोशल मीडियावर वायरल झाले. पोलिसांनीही त्यांच्यावर कडक कारवाई केली. पुण्यातील कोयता गॅंग प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर युवा वर्ग त्याकडे आकर्षित होऊन तसे कृत्य करू लागतो. पोलिसांनीही वेळोवेळी अशांवर कडक कारवाई करत असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारी घेतली.
कोयत्याने हल्ला करत एकाच केले ठार
आता हे लोन सोलापुरात ही वाढत चालले आहे, दोन दिवसांपूर्वी उत्तर कसबा येथील आप्पा उर्फ खंडू बन्ने याच्यावर जमिनीच्या वादातून आठ ते दहा जणांनी मिळून कोयत्याने हल्ला करत जबर मारहाण केली त्यात ते गंभिर जखमी झाले होते अखेर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. कोयता काढून दहशत माजवणे, वार करणे, हल्ला करणे असे अनेक प्रकार सोलापुरात देखील वाढताना पाहावयास मिळत आहेत. सोलापुरात देखील कोयता गॅंग तयार होऊन दहशत माजवते का अशी चर्चा सोलापुरात रंगू लागली आहे.
कोयता काढून दहशत, दुसरी घटना
मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर येथील काशी कापडी गल्ली येथे काल रात्री अशा प्रकारे युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यातून भांडणाचे स्वरूप वाढत गेले आणि अखेर एकाने कोयता बाहेर काढला. कोयता काढत समोरच्या वर अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न देखील झाला. परंतु स्थानिक युवकांनी मध्यस्थी करत हा वाद वाढू दिला नाही. यात भाजप युवा मोर्चा ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष बालाजी सुरेश भिंगारे आणि अजुन एक जखमी झाले आहेत उपचार तेजस्विनी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. जखमीच्या हाताचे हाड तुटले असून पुढील उपचार सुरू आहे. सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. आता यांच्यावर कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलीस आयुक्तांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा
कोयता काडून मारहाण करणे हे असेच वाढत गेले तर आगामी काळात कोयता गॅंग सोलापुरात तयार होईल आणि सर्वसामान्यांच्या राहणीमानात त्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुंडांचे कर्दनकाळ म्हणून ओळख असणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वेळीच अशा घटनेत लक्ष घालून कोयता काढणारे आणि मारहाण करण्यावर कडक कारवाई करावी. आगामी काळात अशा घटना कुणाकडून घडू नयेत यासाठी पावले उचलावीत अशीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.