
सोलापूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे आता आपल्यात नाहीत, वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. रतन टाटा यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतात ज्यावेळी उद्योगपतींचा उल्लेख होतो. त्यावेळी रतन टाटा यांचे नाव प्रथम घेतले जाईल. आपल्या जीवनाच्या सार्थक प्रवासात त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली.
खरे तर रतन टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक देखील म्हटले जाते. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने लोकांना प्रभावित केले. रतन टाटा यांनी जगाला अनेक मौल्यवान गोष्टी दिल्या आहेत. त्यांचे योगदान आज भारतासह संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. वास्तविक, राष्ट्र उभारणीत रतन टाटा यांचे अगणित योगदान आहे, जे विसरता येणार नाही. पण त्यापैकी त्यांची काही काम अशी आहेत ज्यांनी काळाच्या क्षितिजावर अमिट छाप सोडली आहे.
1. कोरोना काळात 500 कोटींची मदत
ज्या वेळी संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीशी झुंजत होते, त्याच वेळी भारतही आरोग्याच्या संकटाशी लढत होता. या संकटाच्या काळात रतन टाटा पुढे आले आणि त्यांनी देशाला 500 कोटी रुपयांची मदत दिली. त्यांनी X (ट्विटर) वर पोस्ट शेअर करताना म्हटलेलं, ‘कोविड-19 हे आपल्यासमोरील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्या भूतकाळातही देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे आल्या आहेत. या वेळेची गरज इतर वेळेपेक्षा जास्त आहे.’
2. पाळीव प्राण्यांसाठी 165 कोटींचे रुग्णालय
रतन टाटा त्यांच्या सौम्य स्वभावासाठी आणि दानशूरपणासाठी ओळखले जात होते. त्यांना कुत्र्यांची खूप आवड होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कुत्र्यांसाठी रुग्णालय उघडले होते. रुग्णालयाचे उद्घाटन करताना ते म्हणाले होते की, ‘मी कुत्र्यांना माझ्या कुटुंबाचा भाग मानतो. मी माझ्या आयुष्यात अनेक पाळीव प्राणी पाळले आहेत. यामुळे मला हॉस्पिटलचे महत्त्व कळते.’ त्यांनी नवी मुंबईत बांधलेले रुग्णालय पाच मजली असून, त्यामध्ये एकाच वेळी 200 पाळीव प्राण्यांवर उपचार करता येतात.
हे रुग्णालय 165 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. रतन टाटा यांचे कुत्र्यांबद्दलचे प्रेम यावरूनही समजू शकते की ते एकदा कुत्र्याला मिनेसोटा विद्यापीठात घेऊन गेले होते. जिथे कुत्र्याचे जॉइंट रिप्लेसमेंट करण्यात आले.
3. वाहन निर्मिती क्षेत्रात मोठं योगदान
टाटा समूह पूर्वी फक्त मोठ्या वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखला जात होता. पण 1998 मध्ये रतन टाटा यांनी छोट्या वाहनांच्या जगातही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी टाटा इंडिका बाजारात आणली. टाटा इंडिका ही पूर्णपणे स्वदेशी कार होती. जी लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरली. त्यांच्या या कारने नंतर विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडून बाजारात नवा विक्रम प्रस्थापित केलेला. सुमारे एक दशकानंतर, टाटांनी आणखी एक प्रयोग केला आणि 2008 मध्ये त्यांनी नॅनो कार बाजारात आणली, ज्याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी होती.
4. टाटा इंडिकाने रचला इतिहास
असं म्हटलं जातं की, कोणतेही उद्दिष्ट खूप मोठं नसतं फक्त तुम्ही ते मन लावून पूर्ण केलं पाहिजे. याचंच उदाहरण म्हणजे रतन टाटा.. त्याचं झालं असं की, टाटा इंडिका बनवणारी कंपनी ही प्रचंड तोट्यात आली होती, त्यामुळे 1999 मध्ये टाटांनी ती विकण्याचा निर्णय घेतला. खरं तर रतन टाटा यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. पण तरीही त्यांनी हा निर्णय घेतला होता आणि आपली कार कंपनी बिल फोर्डला विकावी असं त्यांच्या मनात होतं. पण बिल फोर्ड यांनी खोचकपणे टाटा यांना म्हटलं की, ‘जर तुम्हाल प्रवासी गाड्या बनवण्याचा अनुभव नव्हता, तर हा असा बालिशपणा का केला?’ बिलच्या या वाक्यामुळे टाटा भयंकर दुखावले गेले आणि त्यांनी कंपनी विकण्यास नकार दिला. त्यानंतर टाटांच्या इंडिका कारने एक इतिहास घडवला.
पण एका दशकानंतर काळ बदलला आणि फोर्ड मोटर्सची स्थिती बिघडली. त्यामुळे फोर्ड कंपनी विकावी लागली आणि रतन टाटांनी ती विकत घेतली.
5. TCS ची निर्मिती
जेव्हा लोक भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांचा उल्लेख करतात तेव्हा त्यांच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे TCS. TCS ही जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग सेवा कंपन्यांपैकी एक आहे. ज्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण केला आहे.