विद्यार्थिनी व महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास तसेच गुड टच व बॅड टच या विषयावर कार्यशाळा, भारती विद्यापीठांमध्ये महिला दिन संपन्न

3 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर व राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून 8 जानेवारी 2025 रोजी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून व्ही.एम. मेडिकल कॉलेजच्या विभाग प्रमुख डॉ. स्मिता चाकोते व प्रसिद्ध अर्थतज्ञ सीए निलाशा नोगाजा लाभल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्या डॉ. स्मिता चाकोते यांचा सत्कार इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांच्या हस्ते तर दुसऱ्या प्रमुख पाहुण्या सी.ए. निलाशा नोगाजा यांचा सत्कार राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या स्वागत पर भाषणामध्ये संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी इन्स्टिट्यूट तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिलीच तसेच भारती विद्यापीठाचा चढता आलेख सांगितला. कार्यक्रमाची प्रस्तावना उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केली व कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू विशद केला. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.शबनम माने व प्रा. स्मिता गंभीरे यांनी करून दिली.

यावेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून समाजाच्या विकासासाठी ज्यांनी भरीव योगदान दिले अशा तीन महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शिक्षणतज्ञ कै. ग.सा. पवार यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती विमल पवार यांचा समाज कार्यातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीमती शामाबी नदाफ यांचा लघु उद्योगातील भरीव कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला व भारती विद्यापीठाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी गवळी हिने एम. एस. डब्ल्यू. परीक्षेमध्ये विद्यापीठात गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. सत्काराच्या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्या डॉ. स्मिता चाकोते व सी.ए. निलाशा नोगाजा यांच्या महिला व आरोग्य तसेच महिला व आर्थिक नियोजन या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये उपस्थित महिला वर्ग व विद्यार्थिनी यांनी प्रमुख पाहुण्यांना विविध प्रश्न विचारले व प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये जर कुटुंबाचे आरोग्य चांगले राखायचे असल्यास महिलांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ. स्मिता चाकोते यांनी सांगितले.

तर कुटुंबाच्या आर्थिक नियोजन मध्ये पुरुषांबरोबर महिलांनीही सहभागी होणे गरजेचे असल्याचे सी.ए. निलाशा नोगाजा यांनी सांगितले. घरातील महिला ही एक उत्तम व्यवस्थापक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यार्थिनी व महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास तसेच गुड टच व बॅड टच या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून कल्याणी ढवळे लाभल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बरबडे व अनिशा गवेकर यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. शिवगंगा मैंदर्गी यांनी काम पाहिले आभार प्रदर्शन सौ. प्रांजली मोहीकर यांनी केले. यावेळी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थिनी महिला कर्मचारी तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!