सोलापूर : प्रतिनिधी
“मागील तीन ते चार वर्षापासून सातत्याने निवेदने, धरणे आंदोलने, निदर्शने तसेच अनेक वेळा संप करून सुद्धा आवश्यक तितक्या प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सर्व संवर्गात नोकर भरती होत नाही. बँक ऑफ महाराष्ट्र चे वरिष्ठ व्यवस्थापन अहंकारयुक्त दर्पाने आंधळे, मुके आणि बहिरे झाले आहे. यांना बँकेच्या उच्च परंपरा, बँकेचे मालक असलेली जनता आणि ग्राहकांचे होणारे हाल, अपुऱ्या कर्मचारी अधिकारी वर्गामुळे त्यांच्या वरील तणाव याकडे मुजोरपने दुर्लक्ष देवून आपल्याच मस्तीत वागत आहे. त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्र बँकेतील संघटनेस बेमुदत संप सुद्धा करावा लागला तर त्यास जबाबदार बँकेचे चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापन जबाबदार असेल,”असा इशारा महाबँक कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिला.
या बँकेत एक दिवसाचा इशारा संप सोलापूर शहरात कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून पूर्ण यशस्वी केला. “अपुऱ्या कर्मचारी अधिकारी संख्येचा विपरीत तात्काळ परिणाम ग्राहक सेवे वरती होताना दिसून येतो आहे. ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत रांगेत उभारावे लागत आहे. बँक गेली अनेक वर्षे प्रचंड नफा कमावून उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, मग या नफ्याच्या बदल्यात ज्या ग्राहकांच्या जीवावर हा नफा कमावला जातो, त्या ग्राहकांना निकृष्ट सेवा देण्याचे दुष्ट धोरण, शोषण करणारे धोरण बँक व्यवस्थापनाने अवलंबीने, हा ग्राहकांचा अवमान आणि कृतघ्नपणा आहे. त्यामुळे उत्कृष्ट सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ग्राहक सेवेचे बारा वाजलेले आहेत. त्यामुळेच “ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र फेडरेशन” या ए आय बी ई ए शी संलग्न असलेल्या संघटनेने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकर भरती या प्रमुख मागणी साठी 20 मार्च 2025 रोजी संपाची हाक दिली कर्मचाऱ्यांच्या आजारपणासाठी,प्रमुख सांसारीक व आवश्यक गरजांसाठी रजा मिळत नाहीत. अनेक शाखा मध्ये शिपाई नाहीत.त्यामुळे तेथील शिपायांची कामे कंत्राटी पद्धतीने करून घेतली जातात, जे ग्राहकांच्या ठेवीदारांना धोकादायक आहे.मागील दहा वर्षात अनेक नवीन शाखा उघडल्या गेल्या व बँकेचा व्यवसाय ही अनेक पटीने वाढलेला आहे परंतु कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येते आहे.ऑल इंडिया फेडरेशनने तात्काळ नोकर भरतीची मागणी केलेली आहे.
बँकेचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने बँक चालवू पाहतआहे.संघटनासोबत केलेल्या करारांचे पालन बँकेकडून केले जात नाही. संघटनांचे ताब्यात घेतलेले ऑफिसेस सुद्धा बँकेच्या व्यवस्थापना कडून संघटनांना परत दिले जात नाहीयेत. त्यामुळे एकूणच या मनमानी, दादागिरी व हुकूमशाही कारभाराविरोधात संघटनांनी आजचा संप पुकारल्याचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ. संतोष चितळकर यांनी सांगितले. आजचा संप ही व्यवस्थापनाच्या दादागिरी, मनमानी विरोधात व नोकर भरतीच्या प्रमुख मागण्यासाठी होऊ घातलेल्या संघर्षाची सुरुवात असल्याचे व येथून हा लढा आणखी तीव्र बनत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तम ग्राहक सेवेसाठी नोकर भरती या प्रमुख मागणीसाठी करीत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र मधील या संपास ग्राहकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष कॉ.उत्तम होळीकर यांनी केले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जुळे सोलापूर समोर जमून जिल्हाभरातील 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी हातात मागणी फलक घेऊन व मुजोर व्यवस्थापनाचे विरोधात घोषणा देऊन दणदणीत संप साजरा केला. यावेळी जिल्हा भरातून सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज बँकेच्या जिल्यातील सर्व 52 शाखांचे कामकाज ठप्प होते. यावेळी इतर बँकेतील कर्मचारी संघटनांनी प्रत्यक्ष येऊन या संपास पाठिंबा व्यक्त केला. याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक कॉ अशोक इंदापुरे युनायटेड फॉर्म बँक युनियनचे कन्व्हेनर कॉ सुहास माडेकर महाबँक सेवा निवृत्ती संघटनेचे कॉ प्रसाद आतनुरकर ग्रामीण बँक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड कुसगल पंजाब नॅशनल बँकेचे निवृत्त कर्मचारी कॉ. वीरभद्र माळगे यांची भाषणे व मनोगत त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी आणि नारेबाजी करून संपाची तीव्रता व्यक्त केली आणि पाठिंबा दिला.