सोलापूर : प्रतिनिधी
स्व. चंद्राम चव्हाण गुरुजींनी सत्तेच्या मागे न लागता समाजक ल्याणाचा वसा घेतला. त्यांनी शिक्षणाचा यज्ञ सुरू केल्यामुळेच तांड्यावरचं जगणं सुसह्य झालं. बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुरुजींनी केलेलं कार्य अलौकिक आहे, असे विचार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नेहरूनगर येथे बोलताना व्यक्त केले.
नेहरूनगर येथील मागास समाजसेवा मंडळाचे संस्थापक, दलितमित्र स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड होते. यावेळी व्यासपीठावर आमदार देवानंद चव्हाण (विजयपूर), माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिवशरण पाटील, निवृत्त सनदी अधिकारी बी. के. नाईक, माजी न्यायमूर्ती नामदेव चव्हाण, चेतन नरोटे, शिल्पकार विजय गुजर, ब्रिजमोहन पोफलिया, राष्ट्रवादीचे भारत जाधव, पद्माकर काळे उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, चंद्राम चव्हाण गुरुजी केवळ शिक्षक नव्हते, त्यांनी शिक्षणाबरोबर समाजाला संस्कृत केले. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. हा समाज शिक्षित करून त्यांना स्थिर करण्यात गुरुजींचा मोठा वाटा आहे.
‘परिसस्पर्श’ चे प्रकाशन
यावेळी परिसस्पर्श स्मरणकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यभरातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी महापौर सुशीला अबुटे, अलका राठोड, रवींद्र चव्हाण, अश्विनी चव्हाण, किरण चव्हाण, सचिन चव्हाण, कार्तिक चव्हाण, जयवंत हक्के यांच्यासह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. अॅड. नामदेव चव्हाण यांनी आभार मानले.