सोलापूर : प्रतिनिधी
साफसफाई करण्यासाठी पाण्याची टाकी साफ करताना उतरलेल्या कामगारांचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सोलापूरमध्ये घडली आहे. अक्कलकोट एमआयडीसीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सागर नारायण कांबळे (२० वर्षे) आणि सिद्धराम यशवंत चलगेरी (28 वर्षे) असे मृत कामगाराचे नाव आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्यातील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिघे व्यक्ती गेले होते. दुपारी या कामगारांनी टाकी साफ करण्यासाठी अॅसिड टाकलं, त्यानंतर काही वेळाने साफ करण्यासाठी एक जण खाली उतरला असता तो श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाला. त्याचा प्रतिसाद येतं नसल्याने इतर कामगार देखील खाली उतरले आणि अघटीत घटना घडली.