सोलापूर : प्रतिनिधी
माढा तालुक्यातील नाडी येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी बालाजी तांबे सह दोघांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणाची हकीकत अशी की, यातील फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये घटने पूर्वी भांडणे झाली होती. घटने दिवशी फिर्यादी हे मोटर सायकल वरून गावातील दूध डेअरी समोरून जात असताना आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादिला जाती वाचक शिवीगाळ केली व खोऱ्याच्या लोखंडी पाईपने फिर्यादिला मारहाण केली अश्या आशयाची फिर्याद कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. आरोपी बालाजी तांबे व संतोष तांबे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला होता.
त्यानंतर आरोपी बालाजी तांबे व संतोष तांबे यांनी ॲड. जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या समोर झाली. आरोपीचे वकील ॲड जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की फिर्यादीने फिर्याद देण्यास तीन आठवड्यांचा अक्षम्य विलंब केला आहे.
या उलट सह आरोपीने घटने दिवशी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत फिर्यादी हा आपल्याला ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात गुंतवण्याची धमकी देत आहे असे म्हटले आहे. यावरून फिर्यादीने केलेला ॲट्रॉसिटी चा आरोप धादांत खोटा आहे असा युक्तिवाद केला.
या प्रकरणात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. संगीता शिंदे यांनी काम पाहिले.