सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक तौफीक शेख, माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांच्यासह दहा जणांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तामामा भरणे यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
पाच वर्षांपूर्वी एमआयएम पक्षातून तौफीक शेख आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मात्र, पक्ष प्रवेशाचा निर्णय लांबणीवर टाकला होता.
अखेर मंगळवारी अजितदादांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तामामा भरणे, अल्पसंख्याक विभागाचे नेते वसीम बुर्हाण, इरफान शेख आदी उपस्थित होते. तस्लीम शेख, इब्राहीम कुरेशी, वाहिदाबी शेख, अकिबराजे शेख, जावेद वस्ताद, शोहेब शेख, अकिल नाईकवाडी, युन्नूस शेख, नुरुद्दीन मुल्ला यांचा पक्षप्रवेश झाल्याचे तौफीक शेख यांनी सांगितले.