सोलापूर : प्रतिनिधी
माळशिरस मतदार संघ प्रगतशील असून तालुक्यातील वहुसंख्य तरुण सुशिक्षित आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. तसेच मतदार संघातून ५ राष्ट्रीय महामार्ग गेले असून शेती महामंडळाचे खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करून हजारो एकर क्षेत्र शिल्लक आहे. तसेच तालुक्यात बऱ्याच भागात पडीक व मोकळी जमीन आहे. तसेच तालुक्यात रेल्वे मार्गही मंजूर झाला असल्याने येत्या काळामध्ये आयात-निर्यात व माल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल. “महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत” (MIDC) झाल्यास तरुणांना रोजगार निर्मिती होईल व बेरोजगारीचा प्रश्न मिटेल.
तरी माळशिरस मतदार संघात तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व विकासासाठी “महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत” (MIDC) मंजूर व्हावी अशा मागणीचे पत्र माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले आहे. माळशिरस तालुक्यात येळीव येथे शेती महामंडळ जागेवर MIDC मंजुर झाली आहे. यामुळे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे माळशिरस तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे आणि अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत आभार देखील मानले आहेत.