खते व बियाणे सोबत लिंकिंग करून अन्य उत्पादने शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत

5 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना योग्य दराने व वेळेत खते बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. तसेच खते बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लिंकिंग न करता खते बियाणे उपलब्ध करून दिली पाहिजेत. लिंकिंग करणाऱ्या संबंधित विक्रेत्यावर प्रशासनाकडून तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश ग्रामविकास, पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राजू खरे, अभिजीत पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, उत्तम जानकर (ऑनलाईन), निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य संचालक विनायक दीक्षित, जिल्हा फर्टिलायझेशन असोसिएशनचे अध्यक्ष बालाजी चौगुले यांच्या सह सर्व उपविभागीय कषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की खरीप हंगात 2025 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक तेवढा खते व बियाण्याचा पुरवठा होईल यासाठी काटेकोर नियोजन करावे. खताची लिंकिंग होणार नाही यावर जिल्हाधिकारी यांनी लक्ष ठेवावे व जो कोणी लिंकिंग करेल त्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. लोकप्रतिनिधी यांनीही त्यांच्याकडे लिंकिंगबाबत तक्रार आल्यास तात्काळ जिल्हाधिकारी यांना कळवावे. लिंकिंग करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीची गय केली जाणार नाही असेही त्यांनी निर्देशित केले.

कृषी विभागाने बोगस बियाणे व खते शेतकऱ्यांना पुरवठा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी त्यासाठी आवश्यक बियाणं व खतांचे परीक्षण करावे. सॅम्पल तपासणीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी. अशा बोगस खाते व बियाण्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खात्री करावी. खते विक्रेत्यांना शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल परंतु त्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही या अनुषंगाने निविष्ठांची विक्री करावी असेही निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.

खरीप हंगाम 2024 अंतर्गत नुकसान भरपाई विम्याची 81 कोटीची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पुढील पंधरा दिवसात उपलब्ध करून द्यावी. कंपनीचे शासनाकडून 142 कोटीची रक्कम शासन स्तरावरून अदा होईलच परंतु विमा कंपनीने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई रक्कम अदा केली पाहिजे असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले. तसेच इन्शुरन्स कंपनीकडे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई नाकारली गेली आहे त्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पुढील आठ दिवसात उपलब्ध करून द्यावेत असेही त्यांनी निर्देशित केले.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खते व बियाणे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लिंकिंग होणार नाही यासाठी सर्व संबंधित विक्रेते व कंपनीची बैठक झालेली असून त्यांना याबाबत कठोर निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे खरीप हंगाम 2024 मधील सोलापूर जिल्ह्याचे 81 कोटीची विमा भरपाई रक्कम बाकी असून त्यातील 48 कोटी हे बार्शी तालुक्याची रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही शेतकऱ्यांना बोगस खते व बियाणे मिळणार नाहीत यासाठी कृषी विभागाच्या वतीने सॅम्पल ची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कृषी विभागाअंतर्गत जिल्ह्यातील ेतकऱ्यांनी विविध पिकांतर्गत हेक्‍टरी चांगले उत्पादन घेतल्याबद्दल शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री महोदय व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाने तयार केलेल्या क्यू आर कोड चे अनावरण यावेळी करण्यात आले. यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आलेली असून या क्यूआर कोड च्या माध्यमातून जी आवश्यक योजना आहे त्या योजनेचा किंवा कोड स्कॅन केल्यानंतर त्या योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे या क्यूआर कोड चा शेतकऱ्यांना त्यांच्याशी संबंधित योग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी खरीप हंगाम 2025 अंतर्गत केलेल्या तयारीची माहिती बैठकीत दिली. खरीप हंगाम 2025 साठी 2 लाख 32 हजार 356 मेट्रिक टन रासायनिक खतांचे अवांटन मंजूर झालेले असून मार्च 2025 अखेर एक लाख 22 हजार 531 मेट्रिक टन अवांटन शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खरीप हंगामाच्या 5 लाख 6 हजार 927 हेक्टर क्षेत्रासाठी 1 लाख 94 हजार 370 मेट्रिक टन बियाण्याची आवश्यकता असून सार्वजनिक यंत्रणाकडे 11 हजार 511 मेट्रिक टन, खाजगी स्तरावर 68 हजार 319 मॅट्रिक टन तर शेतकऱ्यांकडे एक लाख 14 हजार 540 मेट्रिक टन बियाणे उपलब्ध असल्याची माहिती श्री. भोसले यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!