सोलापूर : प्रतिनिधी
यात हकीकत अशी की, ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी यातील फिर्यादी आकाश भोलेनाथ तळभंडारे रा. धाकटा राजवाडा, कौंतम चौक, सोलापूर हे घरकुल परिसरातील पिंकी बार येथे मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी गेले होते व त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास जेवन करुन मित्रांसमवेत घरी जात असताना विडी घरकुल येथील राजेश पायलेट चौक येथे पान खाण्यासाठी प्रतिक पान शॉप येथे गेले असता,
आरोपीनी मिळून मागील भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीस जबरदस्तीने गाडीवर बसवून एच. ग्रुप जुना विडी घरकुल परिसरात घेऊन गेले व तेथे नेऊन फिर्यादीवर खुनी हल्ला करुन मारहाण केली. अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने १० फेब्रुवारी २०२५ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली होती.
तद्नंतर पोलीसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी नामे ईश्वर उर्फ रॉनी चौगुले व गणेश भोसले यांना अटक केली होती. तद्नंतर फिर्यादीने त्यांचा पुरवणी जबाब दिला व त्या जबाबावरुन सदर गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आलेली होती. तद्नंतर यातील आरोपींनी जामीन मिळावा म्हणून सोलापूर येथील मे. विशेष न्यायाधीश श्री. मोहिते साहेब यांचे न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. त्या जामीन अर्जास सरकार पक्षाच्यावतीने व मुळ फिर्यादीच्या वतीने लेखी स्वरुपात हरकत देखील घेण्यात आलेली होती. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीच्या वकीलांनी महत्वाच्या बाबी मे. कोर्टाच्या निर्दशनास आणून दिल्या तसेच आरोपींच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन मे. न्यायालयाने सदर गुन्ह्यातील दोन्ही मुख्य आरोपींचा जामीन अर्ज मंजुर केला.
यात मुळ फिर्यादीच्या वतीने अॅड. व्ही. एस. गायकवाड, सदरकार पक्षाच्या वतीने अॅड. बुजरे यांनी तर आरोपींच्या वतीने अॅड. रविराज दिनकर सरवदे यांनी काम पाहिले.