सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी चार हुतात्म्यानी बलिदान दिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रात नाहीतर संपूर्ण देशामध्ये सोलापूरला हुतात्म्याची नगरी म्हणून ओळखले जाते. ज्या हुतात्म्यानी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत अल्पवयामध्ये कुठल्याही गोष्टीचा किंवा प्रपंचाचा विचार न करता देशासाठी त्याग केला आणि मोठ्या आंदोलन उभा करून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हातभार लावला ब्रिटिश शासनाने त्यांच्या वयाचा विचार न करता आणि त्यांच्या प्रपंचाचा विचार न करता त्यांना फाशीवर चढवले हे सोलापूर शहर विसरू शकत नाही.
परंतु त्यांनी केलेल्या योगदानाला आज पर्यंत सोलापूर शहर वासियाने असे कुठलेही ठोस स्मारक उभारून त्यांची स्मृती जागवली नाही. महापालिकेने एक नाट्यगृहाला त्यांचं नाव दिलं त्या नाट्यगृहाची अवस्था आपणास माहिती आहे, असे कुठलेही स्मारक सोलापूर शहरांमध्ये हुतात्म्याचे नाही जेणेकरून पुढल्या पिढीला हुतात्म्याचे स्मरण व्हावे आणि संपूर्ण भारतामध्ये हुतात्म्यांची माहिती कळावी म्हणून सोलापूर शहर विमानतळाला हुतात्म्याचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांनी केली.
सोलापूर विमानतळास हुतात्म्यांचे नाव दिल्यास जगामध्ये या विमानतळाचे नाव जाणार आहे त्या दृष्टिकोनातून सोलापूरच्या हुतात्म्यांचे नाव देखील जगभर जाईल आणि ज्या वेळेस येणारी पिढी हे नाव कोणाच आहे याची माहिती घेईल तेव्हा सोलापूरच्या हुतात्म्यांचा इतिहास त्यांना समजेल. या माध्यमातून हुतात्म्यांची नगरी म्हणून सोलापूरचे जे नाव आहे, ते नाव खऱ्या अर्थाने सोलापूर विमानतळास साजेसे आहे असे मत देखील सुनील रसाळे यांनी व्यक्त केले.