सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने व सोलापुर चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या १५ वर्षाखालील जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड, सिद्धार्थ कोठारी श्रेयस इंगळे, श्रेयस कुदळे, वेदांत मुसळे, सानिध्य जमादार, वेद आगरकर, हर्ष हलमल्ली, श्लोक चौधरी तसेच मुलींच्या गटात सानवीगोरे, श्रेया संदूपटला, अनन्या उलभगत, पृथा ठोंबरे, यांनी आकर्षक विजय मिळवले. तर मानांकित हिमांशू व्हनगावडे याला नवोदित निखिल पवार याने बरोबरीत रोखले.
सात रस्ता येथील इरण्णा उपलप मंगल कार्यालय येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सोलापुर शहरासह करमाळा, पंढरपुर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, माढा आदी तालुक्यातील ८७ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. प्रथम येणाऱ्या चार मुले व मुलींची निवड छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड बुद्धीबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सात वर्षीय उदयोन्मुख खेळाडूंनी देखील उत्कृष्ट खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन नामवंत उद्योजक द्वारकाप्रसाद उपलप व निवृत्त रेल्वे अधीक्षक ॲड. सरिता मोकाशी यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली. अध्यक्षीय मनोगतात उपलप यांनी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी हार व जीत यापेक्षा जिद्द व चिकाटी महत्त्वाचे असल्या बाबत सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, प्रशांत पिसे, यश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले.