NTPC सोलापूरकडून महात्मा गांधी प्राणी संग्रहालय साठी CSR अंतर्गत रु. 2.79 कोटींचा निधी प्रदान.

3 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

2 जून 2025 — कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत NTPC सोलापूर यांनी सोलापूर महापालिकेच्या अखत्यारितील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय यासाठी रु. 2.79 कोटींचा निधी आज सुपुर्द केला. हा निधी काळवीट अधिवास व निवासस्थान, बिबट्या क्राल परिसर, सिंह क्राल परिसर, तसेच मोरांचे अधिवास व निवासस्थान उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे प्राणीसंग्रहालयाची सुविधा आणि अभ्यागतांचा अनुभव दोन्ही अधिक समृद्ध होतील.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सतीश एस. चौगुले, पशुवैद्यकीय सर्जन (पशुवैद्यकीय व प्राणी संग्रहालय विभाग, सोलापूर महापालिका) यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी प्राणी संग्रहालयाची पार्श्वभूमी सांगितली आणि आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी CSR उपक्रम प्रत्यक्षात आला असल्याबद्दल आभार मानले.

कार्यक्रमात NTPC सोलापूरचे कार्यकारी संचालक बी.जे.सी. शास्त्री, HR विभागप्रमुख मनोरंजन सारंगी, पर्यावरण विभागप्रमुख रफीक उल इस्लाम, DGM HR कविता गोयल, अमित सिंग, अर्चन पाठक, गुरुदत्त शर्मा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

सोलापूर महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपआयुक्त किरणकुमार मोरे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, उप अभियंता किशोर सातपुते व प्राणीसंग्रहालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी NTPC सोलापूरचे कार्यकारी संचालक श्री. शास्त्री यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले. आपल्या भाषणात त्यांनी NTPC सोलापूरच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि असे CSR उपक्रम भविष्यातही सातत्याने व्हावेत असे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, रु. 2.79 कोटींचा निधी प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांच्या अधिवास व सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच एनटीपीसी यांचेमार्फत प्राणी संग्रहालय परिसर व सोलापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याबद्दल विचार मांडले.

यानंतर बी.जे.सी. शास्त्री यांनी आपल्या प्रमुख भाषणात NTPC सोलापूरकडून सोलापूर शहराच्या पर्यावरणीय आणि नागरी विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय हे शैक्षणिक आणि पर्यटन दृष्टीने एक समृद्ध ठिकाण बनू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

HR विभागप्रमुख मनोरंजन सारंगी व पर्यावरण विभागप्रमुख रफीक उल इस्लाम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना NTPC च्या दीर्घकालीन, शाश्वत विकास आणि समाजाभिमुख CSR दृष्टिकोनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या शेवटी, श्री शास्त्री, डॉ. ओम्बासे, श्री. सारंगी आणि श्री. इस्लाम यांच्या हस्ते आंब्याच्या रोपांची झाडाची वृक्षारोपण करण्यात आले. जी पर्यावरण संवर्धनाचा प्रतीकात्मक संदेश देणारी कृती ठरली.

कार्यक्रमाचा समारोप डॉ. सतीश चौगुले यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी NTPC आणि सोलापूर महापालिकेच्या सर्व मान्यवरांचे तसेच श्री. अमित सिंग, कु. अर्चन पाठक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम आयोजनासाठी मदतीबद्दल विशेष उल्लेख करून आभार मानले.

हा उपक्रम NTPC सोलापूर आणि सोलापूर महापालिका यांच्यातील सहकार्याचे एक नवीन पर्व ठरले असून, महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय हे भविष्यात सोलापूरकरांसाठी एक शैक्षणिक, पर्यावरणीय आणि पर्यटनाचे आधुनिक केंद्र ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!