सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या फॅब्रिकेशन कारखान्यात 18 मे रोजी भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेला अखेर 18 दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आगीत तब्बल 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणात मृत मालकासह त्याचा मुलगा व सून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारखान्याच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम करताना सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले गेले नाहीत. मार्जिन न सोडणे, कामगारांना निवासासाठी परवानगी नसताना इमारतीत ठेवणे आणि अग्निशमन सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करणे आदी गंभीर त्रुटीमुळे ही दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कारखान्याचे मालक उस्मानभाई मन्सुरी (मृत), त्यांचा मुलगा हनीफ उस्मानभाई मन्सुरी आणि सून इशरत हनीफ मन्सुरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर एमआयडीसी, अग्निशमन विभाग, व सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे तपास करून अहवाल सादर केला. यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय बनसोडे यांनी या प्रकरणात फिर्याद दाखल केली आहे.
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात दि.१८/०५/२०२५ रोजी अक्कलकोट MIDC क्षेत्रात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या दुर्देवी जीवीत व वित्त हानीच्या अनुषंगाने निदर्शनास आलेल्या कारणांच्या अनुषंगाने संपूर्ण MIDC क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा गोषवारा सोबत जोडला आहे. तरी जिल्हाधिकारी प्राधिकरण अंतर्गत पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित असे म्हणत महापालिकेच्या वतीने पत्र काढले आहे.
एम.आय.डी.सी.अक्कलोट रोड परिसराचा दि.२२/०५/२०२५ ते दि.३०/०५/२०२५ पर्यतचा एकत्रित अहवाल सादर केला आहे.
भेट दिलेली मिळकती : 932
अनधिकृत बांधकामे : 57
सामासिक अंतरात अवैध वापर असलेल्या इमारती : 737
मिश्र वापराच्या इमारती : 215
अग्निशमन सुविधा नसलेल्या इमारती :458
अर्धवट अग्निशमन सुविधा असलेल्या इमारती : 447
अग्निशमन सुविधा असलेल्या इमारती : 27
अनधिकृत रहिवास वापर : 67
आता यावर कोणती कारवाई होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..