सोलापूर : प्रतिनिधी
प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा माने-मुसळेवर ७०९ पानी आरोपपत्र दाखल केले. या दोषारोपपत्राचा अभ्यास करून जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी आरोपीचे वकील अॅड. प्रशांत नवगिरे यांनी मंगळवारी कोर्टासमोर मुदत मागितली. यासाठी कोर्टाने शनिवार, २१ जून रोजी तारीख दिली.
यात पोलिसांनी ७३ जणांचे जबाब नोंदविले होते. या साक्षीदारांपैकी जवळपास ४४ साक्षीदार हे हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत. दरम्यान, ७०९ पानांच्या या दोषारोपपत्रात सीडीआर जोडलेले नाही. यामुळे घटनेच्या दिवशी डॉ. शिरीष वळ संपर्क केला हे स्पष्ट होत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. डॉ. वळसंगकर यांनी १८ एप्रिलला गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी १९ एप्रिलला गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मुख्य आरोपी मनीषा मुसळे हिला १९ तारखेला रात्री अटकझाली. २० तारखेला कोर्टात हजर केले. तेव्हापासून ती ७ दिवस पोलिस कोठडी आणि उर्वरित दिवस न्यायालयीन कोठडीत आहे.
बँक स्टेटमेंट ३५० पानांचे
या दोषारोप पत्र हे ७०० पाने असले तरी यातील जवळपास साडेतीनशे पाने हे मनीषाचे तीन बँकेतील स्टेटमेंट आहेत. दरम्यान, याबाबत फॅरेन्सिक अहवाल अद्याप आलेले नाही. हे अहवाल आल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.