सोलापूर : प्रतिनिधी
मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे खाजगी दौऱ्यानिमित्त सोलापूरला आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. 21 जून रोजी बाळा नांदगावकर यांचा वाढदिवस असून त्यानिमित्त ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज, तुळजाभवानी येथील श्री आई तुळजाभवानी यांचे दर्शन घेण्यासाठी ते आले होते.
यावेळी मनसेचे दिलीप धोत्रे, जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख अभि रंपुरे, वाहतूक सेना अध्यक्ष प्रसाद कुमठेकर, शिक्षक सेनेचे संतोष घोडके, प्रकाश कोळी, कामगार सेनेचे श्रीधर गुंडेली, गोविंद बंदपट्टे आदींचं मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांनी त्यांचा सत्कार केला.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. एकंदरीतच मनसे नेत्याच्या सत्काराला शिवसैनिक आल्याने शासकीय विश्रामगृहात चर्चेला उधान आले होते. सत्कारा नंतर शिवसैनिक आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यात जुन्या आठवणींना उजाळा देत चर्चा झाली.
बाळा नांदगावकर जेव्हा प्रचंड मतांनी निवडून आले होते त्यावेळेस दोन भावांनी जो जल्लोष केला होता, तो जल्लोष पुन्हा एकदा व्हावा अशी इच्छा देखील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेना एकत्र यावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत याची सुरुवात महाराष्ट्रात सर्वप्रथम सोलापुरातून झाली. सोलापुरातील शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र येत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले होते, यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एकत्र यावे आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांना वाचवावे असा संदेश देखील दिला होता. आज शिवसैनिकांनी मनसे नेत्याचा केलेला सत्कार आणि त्यांच्यातील झालेली चर्चा मात्र सोलापुरात चर्चेचा विषय बनली आहे.