सोलापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाबाबत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे विनोद भोसले यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना जाधव म्हणाले, महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. या निर्णयाविरोधात काही जण न्यायालयात गेले. काँग्रेसने आमदार राम सातपुते यांच्यावर टीका करण्यापेक्षा मराठा समाजासाठी काय केले ते सांगावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी देणे का टाळले ते सांगावे, असे प्रत्युत्तर भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिले.
त्यामुळे आरक्षणाचा विषयी निकाली निघत नाही तोपर्यंत मी फेट्याचा सन्मान स्वीकारणार नाही असे सातपुते म्हणाले होते, परंतु विनोद भोसले आणि काँग्रेसला हे बघवले नाही. त्यांनी निषेध करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला. वास्तविक त्यांच्या नेत्यांनी सरकोली गावात समाज बांधवांवर कशा पद्धतीने टीका केली होती, हे विसरायला नको. एमआयए आणि वंचित बहुजन आघाडीने माघार घेतल्यामुळे काँग्रेसचे नेते सध्या हवेत आहेत. त्यांना हवेतच राहू द्या. समाज बांधवांचे कुणी कसे नुकसान केले, हे सर्वजण जाणून आहेत. काँग्रेसचा भ्रम जनताच दूर करणार आहे असेही माजी नगरसेवक अनंत जाधव म्हणाले.