सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयाच्या गेटला धडक देऊन एक जुनी आम्बेसेडर कार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आतमध्ये शिरली.
त्यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी तातडीने सदर बझार पोलिस व आरसीबीचे पथक त्याठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले.
सात रस्ता परिसरातील हुमा मेडिकलकडे जाणाऱ्या रोडवर मनीष काळजे यांचे संपर्क कार्यालय आहे. रात्री आठच्या सुमारास अचानकपणे एक जुनी अॅम्बेसेडर कार एमएच ०१ झेडए ०४२४ लष्करकडे जाणाऱ्या रोडवरून काळजे यांच्या संपर्क कार्यालयाच्या दिशेने आत शिरली. कार्यालयासमोरील लोखंडी गेटला धडक देऊन कार आतमध्ये आली.
काही वेळातच पोलिसांना याची खबर लागताच सदर बझार पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी आरसीबीचे पथक देखील बोलावले होते. आता कार कोणाची आहे, रस्ता सोडून त्या संपर्क कार्यालयाच्या गेटला कशी धडकली, याचा तपास पोलिस करीत आहेत.
त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी पडताळले. पोलिस निरीक्षक ढवळे यांच्यासह सदर बझार पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार त्याठिकाणी होते. पोलिसांचे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.