दक्षिण सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी लढून जिंकणार : संतोष पवार

सोलापूर : प्रतिनिधी
“सोलापूर दक्षिणच्या विकासाला नवीदिशा देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. लोकांना हवा असलेला बदल देण्यासाठी माझी तयारी झाली असून सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर मी ही निवडणूक नक्की जिंकणार आहे!” अशा आत्मविश्वासपूर्ण शब्दात सोलापूरमधील मार्ग फाऊंडेशनचे संस्थापक संतोष पवार यांनी भावना व्यक्त केल्या. सोलापूरमधील विविध नवरात्र महोत्सवांना भेटी दिल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते.
सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्यरत असलेले संतोष पवार यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत लढण्याची आज अधिकृत घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, दक्षिण सोलापूरच्या प्रगतीसाठी स्थानिक भूमिपुत्राने पुढे येणे आता काळाची गरज आहे। मला संपूर्ण विश्वास आहे की, सोलापूरच्या सुजाण जनतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक नक्कीच जिंकू.
शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक युवकांच्या रोजगार संधी, महिला सक्षमीकरण, शहरी व हद्दवाढ भागातील समस्या यांसाठी विविध योजना आणि उपक्रम सातत्याने राबवणाऱ्या मार्ग फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संतोष पवार यांना आता लोक प्रसिद्ध समाजसेवक म्हणून ओळखतात. जनतेच्या अडचणी सोडवण्याचे कार्य आत्तापर्यंत न थांबवता त्यांनी सुरुच ठेवले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांत जनतेच्या हक्कांसाठी केंद्रित ध्येयधोरणे राबवणाऱ्या मार्ग फाऊंडेशनच्या जवळपास ५०+ शाखा सध्या कार्यरत आहेत. यात महिलांच्या शाखांचाही समावेश आहे.
प्रस्थापितांनी भोळ्या जनतेला फसवत फक्त सत्तेची चव चाखली आहे. तालुक्याच्या विकासाकडे व प्रलंबित प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष करून परस्पर सोयीची भूमिका घेणारे राजकारण केलं आहे. दक्षिण सोलापूरला आता विकासाची नवीन दिशा हवी आहे. प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि गावागावांतून विकासाची गंगा वाहत असेल. मी निवडणूक केवळ जिंकण्यासाठी नाही, तर लोकांच्या विश्वासाचे नेतृत्व करणारा सेवक म्हणून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुक लढवण्याच्या घोषणेनंतर समाजातील विविध घटकांमधून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत विविध सामाजिक संघटना आणि संस्थांनी केले आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्य आणि सर्वसामान्यांच्या समस्यांच्या समाधानासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना जनतेचा भरभरून पाठिंबा मिळत आहे. लोकहितासाठी, त्यांच्या कल्याण आणि विकासाची नवी दृष्टी घेऊन मी या लढाईत उतरणार असल्याचे ते म्हणाले.
दक्षिण सोलापूरची जनता आता परिवर्तनाची वाट पाहत असून, त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून, त्यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त करत आहे. त्यांच्या निवडणूक लढवण्याने दक्षिण सोलापूरच्या जागेवरील चुरस वाढली आहे हे नक्की.