संभाजी आरमारच्या दसरा दरबारात उजनीच्या पाण्याचा जागर

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

प्रतिवर्षी संभाजी आरमारच्या वतीने विजया दशमी निमित्त “दसरा दरबार” आयोजित केला जातो. या दरबारामध्ये कर्तबगार व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जातो सोबतच समाजप्रबोधनपर व्याख्यान देखील आयोजित केले जाते. राज्यभरातील नामवंत वक्त्यांनी मागील १७ वर्षांपासून हा दरबार गाजविला आहे. यंदाच्या वर्षीदेखील शनिवार दि. १२/१०/२०२४ रोजी सकाळी ठीक १० वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे हा दरबार भरणार आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभहस्ते उदघाटन होणार असून पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, दक्षिण तहसीलदार किरण जमदाडे, स्त्रीरोगतज्ञ् डॉ. अनिल हुलसूरकर, मेंदूविकार तज्ञ् डॉ. एस. प्रभाकर यांच्या याप्रसंगी प्रमुख उपस्थिती असणार आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल ऍड. अमीत आळंगे, युवा उद्योजक सिद्धेश्वर मोरे, स्मशान सुधारक प्रवीण मुसपेठ, रॉबिनहूड आर्मीचे हिंदुराव गोरे, विधी पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम गौरव काळे या सर्वांचा सन्मान केला जाणार आहे.

वृक्ष लागवडीच्या माध्यमातून बार्शी शहरामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या वृक्ष संवर्धन समिती, बार्शी यांना देखील सन्मानित केले जाणार आहे. विशेष म्हणजे जल अभ्यासक पत्रकार रजनीश जोशी यांचे “उजनी धरण : तारक की मारक” या अतिशय ज्वलंत विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. उजनी धरण सोलापूरची नि:शंक वरदायिनी आहे.

मात्र सोलापूरची तहान भागविणारी उजनी कमालीची प्रदूषित झाली असून सोलापूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक झाली आहे हे देखील दाहक वास्तव आहे. उजनीचं हे दाहक वास्तव आणि उजनी प्रदूषणमुक्त होण्याच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी तमाम सोलापूरकरांनी या दसरा दरबार सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आणि कार्याध्यक्ष तात्यासाहेब वाघमोडे यांनी केले  आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!