सोलापूर : प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील हराळवाडी ग्रामस्थांवर मागील तीन महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतची बोर जळाल्याने आभाळ वृद्धांची पाण्यासाठी परवड होतेय. जिथं पाणीच मिळत नाही आशा गावात राहावं तर कशासाठी म्हणत महिलांच्या डोळ्यात अश्रू आलेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आता विधानसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय.
जेमतेम 3 हजार लोकसंख्या असलेल्या हराळवाडी गावात पाण्याचा ठोस सोर्स नाही. ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या बोरवर गावकऱ्यांची पाण्याची भीस्त अवलंबून आहे. मागील वर्षी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या दुरुस्ती साठी आलेल्या 28 लाख रुपयातून गायरान जमिनीतून नवीन पाईप लाईन टाकून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवून गरजेचे होते.
मात्र ठेकेदाराने अधिकाऱ्यांनी संगणमत करत जुन्याच पाणीपुरवठा पाईपलाईन ची दुरुस्ती केली. जागोजागी या पाईपलाईनला गळती लागल्याने ही योजना सध्या बंद आहे. मागील तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत समोर असलेला बोरवेल जळाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
एकाच बोअरवर संपूर्ण गावाचा लोड असल्याने नेहमीच ग्रामपंचायती समोर असलेली बोरवेल जळत असते. वारंवार ग्रामस्थ स्वखर्चातून या बोरवेलची दुरुस्ती करत असतात. ग्रामस्थांनाच बोअर दुरुस्ती चा खर्च करावा लागत असेल तर पाणीपट्टी, घरपट्टी, नळपट्टी आकारताच कशाला ? त्यामुळे अशा गावात राहण्याचा उपयोगच काय ? असं म्हणत चक्क महिलांनी डोळ्यात पाणी काढलं. तर तरुणांनी पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास विधानसभेला समस्त ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालतील असा इशारा दिलाय.