डी.राम रेड्डी, केतन वोरा मित्र परिवारातर्फे ३ हजार २२० गरजूंना दिवाळी फराळ

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

समाजासाठी तळमळीने कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था म्हणजे देशाचे भविष्य आहेत, असे प्रतिपादन बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी केले. ३२ संस्थांमधील ३ हजार २२० गरजूंना केतन वोरा मित्र परिवारातर्फे दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम उद्योगवर्धिनी संस्थेत शनिवारी झाला. उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, व्यापारी बँकेचे अध्यक्ष गिरिधारी भुतडा, केतन वोरा, नंदकुमार आसावा, उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी उपस्थित होते.

३२ सामाजिक संस्था आणि समाजांसाठी चिवडा, लाडू, चकली, गोड शंकरपाळी, शेव, करंजी, अनारसे, खारी शंकरपाळी असे दिवाळी फराळाचे पदार्थ उद्योगवर्धिनी संस्थेतर्फे तयार करण्यात आले आणि केतन वोरा मित्र परिवारातर्फे या फराळाचे वाटप याप्रसंगी करण्यात आले.

श्री. रेड्डी म्हणाले, मनुष्याला मृत्यूनंतर सोबत काहीच नेता येत नाही आणि जीवन जगण्यासाठी स्वतःला किती लागते ? याचा विचार जर प्रत्येकाने केला तर समाज बदलाची प्रक्रिया वेगाने होईल. आपल्या पूर्वजांनीही हीच शिकवण आपल्याला दिली आहे. वंचितांसाठी काम करणाऱ्या उद्योगवर्धिनी तसेच या सामाजिक संस्थांचे काम पाहून आत्मिक समाधान मिळते, असेही श्री रेड्डी याप्रसंगी म्हणाले.

उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविक तर सचिवा मेधा राजोपाध्ये यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी विविध सामाजिक संस्थांचे प्रकल्प प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

या संस्थांना दिला आपुलकीचा फराळ

स्व आधार मतिमंद मुलींची संस्था, प्रार्थना फाउंडेशन, आई संस्था, रॉबिन हूड आर्मी, सोनामाता शाळा, बी. सी. गर्ल्स हॉस्टेल, बी. सी. बॉईज हॉस्टेल, गजानन विद्यालय, प्रेरणा संस्था, आधार संस्था, फोफलिया वृद्धाश्रम, हबीबा संस्था, शांताई वृद्धाश्रम, साकव फाउंडेशन या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील संस्थांना तसेच डोंबारी, मसणजोगी, पारधी, कतारी, मरीआईवाले, बहुरूपी, ओतारी, कैकाडी, लोहार, बंजारा, गोंधळी, रामोशी आदी समाजातील गरजू मुले, ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला यांच्यासाठी केतन वोरा मित्र परिवारातर्फे फराळ देण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!