आरक्षण पिढ्यान् पिढ्या उपयोगी पडेल, लढ्यासाठी साथ देण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

आरक्षण नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील लेकराबाळांचे जीवन संकटात आले आहे. समाजातील लोक शिक्षण घेऊनही आरक्षणाअभावी नोकरी मिळत नाही, मिळाली तरी बढती थांबते. या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी येत्या येत्या २५ जानेवारी २०२५ रोजी अंतरवली सराटी येथे उपोषण आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

ते शुक्रवारी कडा येथील संत मदन महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उपस्थित होते. यावेळी हभप बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदायात सर्व जातीधर्म एकत्रित राहतात. अन्यायाविरोधात लढणे हीच वारकरी संप्रदायाची शिकवण आहे, तीच शिकवण मराठा समाजाने घेतली पाहिजे. मी समाजासाठी जीव द्यायलाही तयार आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, समाजाच्या मुलांवर सुशिक्षित बेरोजगारीची वेळ येऊ नये यासाठी आरक्षणाची लढाई महत्त्वाची आहे. सध्या सरकारकडून “लाडकी बहीण” योजनेसाठी १५०० रुपये दिले जात आहेत, परंतु ही मदत तात्पुरती आहे. आरक्षण पिढ्यान् पिढ्या उपयोगी पडेल, म्हणून सर्वांनी २५ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी व्हावे.

जरांगे पाटील यांनी गावागावांत बैठका घेऊन एकजूट निर्माण करण्याचे आवाहन केले. “समाजासाठी एका दिवसाचा त्याग करून गोरगरीबांच्या सुखासाठी रस्त्यावर उतरा. आरक्षणा साठीचा हा लढा आपण नक्कीच जिंकू.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!