सोलापूर : प्रतिनिधी
सार्वजनिक सुव्यवस्था भंग करणाऱ्या सराईत आरोपीविरुध्द एम.पी.डी.ए.ची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द करण्यात येते. मागील पाच वर्षात तब्बल ७० जणांवर एमपीडीएची कारवाई केली आहे. चालू वर्षात सर्वाधिक तब्बल २५ जणांवर सोलापूर शहर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एम पी.डी.ए. कायदा करणाऱ्या आरोपींवर सोलापूर पोलिस आयुक्तालय प्रशासनातर्फे एम.पी.डी.ए. कारवाई केल्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पडल्या. सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी, म्हणून आयुक्त एम. राज कुमार यांनी शांतता, सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई केली आहे.