CCH ऑनलाईन ॲप माध्यमातुन फसवणूक प्रकरणी जयंत येरेकल्लू यास जामीन

सोलापूर : प्रतिनिधी
जयंत प्रकाश येरेकल्लू, रा. अशोक नगर, विजापूर रोड, सोलापूर यांची ऑनलाईन अॅपचे माध्यमातुन रु. ९१ लाखाची फसवणुक केल्या प्रकरणीच्या मोठ्या खटल्यात सोलापूर येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला.
हकीकत की, ऑनलाईन गुंतवणुक अॅप संदर्भात मोबाईलवर बरेचजणांना मेसेज येत होते त्या प्रमाणेच जुन २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये सोलापूरात सी. सी.एच. ऑनलाईन अॅपच्या नावाखाली बऱ्याच लोकांच्या मोबाईल वर एक आकर्षक गुंतवणूक लाभदर्श विणारा अॅप येत होता त्याद्वारे सोलापूरातील एकूण ८३ गुंतवणूकदारांची फसवणूक झाली होती. त्या मध्ये जयंत येरंकल्लू व अनंत येरंकल्लू या बंधूमार्फत गुंतवणूक झाली, असा आरोप काही गुंतवणुकदारांनी करुन पोलसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन १० जानेवारी २०२३ रोजी सदर जयंत व अनंत येरकल्लु बंधु यांना अटक केली होती. पोलीसांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्याचा खटला सोलापूर येथील विशेष न्यायालयात सुरु आहे.
सदर बाबत यातील एक आरोपी जयंत प्रकाश येरंकल्लु यांनी अॅड. शशी कुलकर्णी यांच्या मार्फत विशेष न्यायालयात जामीन अर्ज ठेवला होता, त्याची सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली. त्यामध्ये आरोपींच्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की, आरोपी हे दोन वर्षापासुन तुरुंगात आहेत, त्यांचे खात्यावर कोणतीही रक्कम जमा नाही. यातील आरोपीने कोणाचीही फसवणूक केली नाही, आरोपीची वैयक्तीक मालमत्ता पोलीसांनी जप्त केलेली आहे आरोपी कोठेही पळून जाणार नाही, इतर मुख्य आरोपीचा जामीन झाला आहे. त्यामुळे ते सुध्दा जामीन मिळणेस पात्र आहेत, आरोपीस जामीन द्यावा असा युक्तीवाद केला सदर युक्तीवाद विचारात घेऊन विशेष न्यायालयाने दोन लाखाच्या जामीनावर आरोपीची मुक्तता करण्याचा आदेश पारीत केला.
सदर प्रकरणात आरोपी तर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, अॅड. आशुतोष पुरवंत, अॅड. अतिश नागणकेरी यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.