सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर शहरात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

निवेदन देण्यापूर्वी महापौरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले. जलसिंचन प्रकल्प, शेतकरी कर्जमाफी, पायाभूत सुविधा विकास, ग्रामीण रस्ते व वीजपुरवठा सुधारणा, औद्योगिक गुंतवणूक वाढ आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती या क्षेत्रांतील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे नमूद करण्यात आले. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी विविध प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला होता, अशी आठवण निवेदनातून करून देण्यात आली.
स्व. अजितदादांचे नेतृत्व, प्रशासनिक पकड आणि कार्यतत्परता यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या निधनानंतर राज्यासह सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली होती. आजही नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल आदरभाव असल्याने शहरातील मध्यवर्ती व प्रतिष्ठित ठिकाणी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह सुशोभित स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, प्रस्तावित स्मारक परिसरात त्यांच्या जीवनकार्याचे दस्तऐवजीकरण, छायाचित्र दालन, ग्रंथालय किंवा अभ्यासिका उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला, जेणेकरून युवकांना त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा समजेल. सोलापूर महानगरपालिका यांनी याबाबत ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “अजितदादा हे केवळ नेते नव्हते, तर विकासाची दिशा दाखवणारे नेतृत्व होते. त्यांचे स्मारक सोलापूरच्या विकास इतिहासातील अभिमानाचे प्रतीक ठरेल,” अशी भावना व्यक्त करण्यात आली. महापौर विनायक कोंड्याल यांनी निवेदन स्वीकारून विषय गांभीर्याने विचारात घेत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. येत्या काळात स्व. अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सुहास कोलारकर, रेवप्पा सुतार, पवन पाटील, सागर रणदिवे, धनंजय शिंदे, विकास शिंदे, श्रीनिवास यादगिरी, संतोष माने, संदेश मुळावकर, सौरभ काटकर आदी उपस्थित होते.
