सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय : सरकारी कामात अडथळा प्रकरणी व्यावसायिकाची निर्दोष मुक्तता

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गाजलेल्या प्रकरणात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मुंबई येथील व्यावसायिक आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

सदर खटल्याची सुनावणी Solapur District and Sessions Court येथे मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. जे. कटारिया यांच्या न्यायासनासमोर झाली. न्यायालयाने सबळ पुराव्यांचा अभाव व उलट तपासातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा विचार करून आरोपी विकास बेटश्वर दुबे यांची 31 जानेवारी 2026 रोजी निर्दोष मुक्तता केली.

प्रकरणाचा तपशील

बाळे हद्दीतील मडकी वस्ती परिसरात 2015 साली ही घटना घडली होती. बाळे पोलीस चौकी येथून पोलिसांनी एका लँड रोव्हर कारचा पाठलाग केला. संबंधित वाहन मडकी वस्ती येथे अडकल्यानंतर चौकशीदरम्यान तीन आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप होता.

या प्रकरणी मुंबई येथील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी आरोपी क्रमांक 1 विकास बटेश्वर दुबे हे व्यावसायिक, आरोपी क्रमांक 2 ओमप्रकाश शामबिहारी तिवारी हे कस्टम अधिकारी, तर आरोपी क्रमांक 3 अनंत देवीप्रसाद त्रिपाठी हे त्यांचे मित्र होते. दरम्यानच्या काळात आरोपी क्रमांक 2 व 3 यांचे निधन झाल्याने खटला फक्त आरोपी क्रमांक 1 यांच्याविरुद्ध सुरू राहिला.

 

सुनावणीदरम्यान मांडलेले मुद्दे

सरकार पक्षातर्फे फिर्यादी पोलीस, दोन साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र, बचाव पक्षाने उलट तपासात साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती अधोरेखित केल्या. घटनास्थळ, पाठलागाची परिस्थिती तसेच आरोपींच्या कथित वर्तनाबाबत ठोस व निर्विवाद पुरावा नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने मांडला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शंका निर्माण होईल असा पुरावा असल्यास आरोपीस दोषी ठरविता येत नाही, या तत्त्वाचा आधार घेत निर्दोष मुक्ततेचा निकाल दिला.

 

वकिलांची बाजू

आरोपीतर्फे ॲड. युवराज जनार्दन आवताडे, ॲड. दादासाहेब भानुदास जाधव, ॲड. गोरख गवळी, ॲड. मकसूद मोमीन व ॲड. रवी कोळी यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे ॲड. पी. एस. जन्नू यांनी युक्तिवाद केला.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!