सेवाभावाची शिवरात्र : भक्तीबरोबर मानवतेचा सुंदर संगम

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

महाशिवरात्रच्या पावन पर्वानिमित्त शहरातील मंदिरांमध्ये “हर हर महादेव”च्या जयघोषात वातावरण भक्तीमय झाले असताना, दुसरीकडे मानवतेची खरी पूजा साकारत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने गरजू, निराधार तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले.

महाशिवरात्रीनिमित्त भगवान महादेवांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून या सेवाकार्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी सुनील शरणार्थी, सचिन कुलकर्णी, अॅड. नीता मकणी, अॅड. साधना सांगवी, योगप्रभा मंडळाच्या अध्यक्षा प्रभा कोडले, आस्था रोटी बँकेचे सल्लागार राजू हौशेट्टी तसेच विजय छंचुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यानंतर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच निराधार वृद्धाश्रम, झोपडपट्टी भाग आणि इतर गरजू नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यात आला. साबुदाणा खिचडी, राजगिऱ्याचे लाडू, वेफर्स, खजूर, ताक, शेंगदाण्याचे लाडू आणि फळांचे वितरण करण्यात आले. हा फराळ केवळ अन्न नव्हता, तर आपुलकीची ऊब, आधाराची भावना आणि शिवभक्तीची खरी अनुभूती होती.

या सेवाकार्यामागे संस्थेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांची समाजसेवेची प्रेरणा असून, स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला. विद्या सिंघम, सविता जोशी, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनिता तालीकोटी, पुष्कर पुकाळे, संगीता छंचुरे, मंगल पांढरे, ज्योत्सना सोलापूरकर, कविता स्नेहा मेहता, विद्या राऊत, उमा शाबादे, रुक्मिणी लवटे, गीता दळवी, अविनाश मार्चला, सुरेखा पाटील, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, प्रकाश डोंगरे, अंजली शिरसी, सचिन शिंदे, विजय छंचुरे आदींचा सहभाग लाभला.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने “आपल्या आनंदातील थोडासा अंश गरजूंना अर्पण करूया” असा भावनिक संदेश संस्थेने दिला. “भुकेल्याच्या पोटी अन्नाचा घास ठेवला, की महादेव स्वतः प्रसन्न होतो,” या भावनेतून साकारलेला हा उपक्रम शहरात सेवाभावाचा आदर्श ठरला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!