सोलापूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेणाऱ्या ‘अॅक्युसेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सोलापूर सोशल कॉलेजचे सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ. रामप्रकाश अमीरचंद पंजाबी (धिंग्रा) यांनी हे पुस्तक लिहिले असून, असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर अॅन्युएटेड टीचर्स महाराष्ट्र (ACCUSENT) या संघटनेच्या १३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

ही सर्वसाधारण सभा वानखेडे सेलिब्रेशन हॉल (कळमण), नागपूर येथे रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाली. या सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ९५ सेवानिवृत्त प्राध्यापक नागपूर येथे उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. वाहूळ एम.ए., सचिव प्राचार्य डॉ. मंत्री जे.एम., खजिनदार प्राचार्य श्री. नाफडे एस.बी., तर ट्रस्टी म्हणून प्राचार्य मोहम्मद शफी हे कार्यरत आहेत. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मुख्यालय असलेल्या ‘अॅक्युसेंट’ संघटनेच्या कार्याचा इतिहास, उद्दिष्टे व वाटचाल या पुस्तकात मांडण्यात आली आहे.

या प्रसंगी लेखक डॉ. पंजाबी यांनी स्वखर्चाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या १०० प्रती सभासदांना विनामूल्य वितरित केल्या. ‘अॅक्युसेंट’ संघटनेचा प्रसार व प्रचार व्हावा, तसेच सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या योगदानाची नोंद इतिहासात व्हावी, हीच या पुस्तकामागील प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

पुस्तकाची मूळ किंमत रु. ६००/- असून, वाचकांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपस्थित प्राध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, हे पुस्तक संघटनेच्या चळवळीला दिशा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस डॉ आर ए पंजाबी, आनंद भोसले, राजिव पंजाबी, किशोर मोरे आदी उपस्थित होते.
