सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरात साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती उत्सवासाठी विविध मंडळांना आवश्यक परवाने तात्काळ देण्यात यावेत, अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात दरवर्षी १४ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. या काळात विविध मंडळांच्या वतीने भव्य मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, शिवजयंती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही परवाना प्रक्रियेला विलंब होत असल्याने मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत छत्रपती ब्रिगेडने मागणी केली आहे की, पोलीस आयुक्तालयात शांतता समिती व शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी व परवाना प्रक्रिया त्वरित सुरू करावी. तसेच, नवीन मंडळांनाही शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, आगामी सर्व जयंती उत्सवांसाठी डॉल्बी वापरास परवानगी देऊ नये. सोलापूर शहराने डॉल्बीमुक्त शहराची संकल्पना राबवून राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला असून तो कायम ठेवण्यात यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम, जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके, शहराध्यक्ष सिताराम बाबर, जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी, शहराध्यक्ष माधुरी चव्हाण, शहर संघटक बसवराज आळंगे, जिल्हा संपर्कप्रमुख इस्माईल मकानदार, शहर उपाध्यक्ष रमेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
