सोलापूर : प्रतिनिधी
शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडत विविध मागण्या सादर केल्या. शासकीय रुग्णालयातील रस्ते, प्राणी संग्रहालयाच्या आराखड्याची अंमलबजावणी, उद्याने, विद्युत तारा भूमिगत करण्यासह भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी निधीची मागणी करत आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहराच्या प्रलंबित विकासकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, राजू खरे, उत्तम जानकर, नारायण पाटील, अभिजीत पाटील (ऑनलाईन), प्र. जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उप वनसंरक्षक कुलराज सिंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांच्या सह सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, छत्रपती श्री शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना स्ट्रेचरवरून नेताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. धर्मवीर संभाजी महाराज तलाव आणि स्मृती वन या दोन्ही ठिकाणांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला तर या दोन्ही ठिकाणचे सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने करता येईल. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी आणि सुशोभिकरणारासाठी शासनाकडून २१ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे यातील सात कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत उर्वरित कामही लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.
शहराच्या विकास आराखड्यात सुचवण्यात आलेल्या डीपी रस्त्यांना जिल्हा नियोजन समिती किंवा राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा आणि हद्दवाढ भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे या दुरुस्तीकरता देखील निधी मिळावा अशी मागणी आमदार कोठे यांनी, याप्रसंगी केली.
शहरातील झोपडपट्टी तर तसेच गलिच्छ वस्ती सुधारणा भागात वीज पुरवठा करणाऱ्या तारा अनेक ठिकाणी घरांना चिटकून आहेत. या तारांना स्पर्श झाल्यामुळे आजवर अनेकांचे दुर्दैवी मृत्यूदेखील झाले आहेत. हे टाळण्यासाठी या भागातील वीज पुरवठा करणाऱ्या तारा भूमिगत अथवा बंच केबल टाकून सुरक्षित कराव्यात. शहरातील भुईकोट किल्ला सुशोभित करून नागरिकांना पाहण्यासाठी खुला करावा, असेही ते म्हणाले. श्री गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ मार्गावरील वीज पुरवठा करणाऱ्या सर्व तारा भूमिगत करून वीजपुरवठा करावा, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केली. त्याचबरोबर सोलार बोअरसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये सोलापूर महानगरपालिकेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्याही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केल्या.
आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी केलेल्या आग्रही मागण्यांवर शासनस्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी दिले.
